वाढत्या तापमानामुळे मासेमारीवर परिणाम
अनेक मच्छीमार बोटी बंदरातच थांबून,बोटीच्या डिझेलच्या खर्चाइतकेही मासे मिळेना
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी मिळायला प्रारंभ होतो. त्यामुळे एप्रिल आणि मे हे हंगामातील अखेरचे दोन महिने कोळी मच्छीमार बांधवांकरिता आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारे असतात. परंतु यंदा वातावरण आणि विशेषता तापमानात झालेल्या वाढीमुळे समुद्रात मासे मिळेनासे झाले आहेत. एका बोटीला मच्छीमारी करिता जाऊन येण्याकरिता किमान 15 हजार रुपयांचे डिझेल लागते. मात्र मासेमारीला गेलेल्या बोटींना डिझेलच्या किमती इतके देखील सध्या मासे मिळत नसल्याने अनेक मच्छीमार बोटी बंदरातच थांबून राहिल्या आहेत. परिणामी मच्छीमारांमध्ये मोठ्या चिंतेचे वातावरण असल्याची माहिती येथील जाणकार मच्छीमार नाखवा सदा कोळी यांनी दिली आहे.
परप्रांतीय लोकांची कोकणच्या आणि रायगड जिल्ह्याच्या समुद्रात होणारी घुसखोरी आणि फेब्रुवारी ,मार्च महिना समुद्रातील बदलामुळे झालेल्या माशांच्या स्थलांतरामुळे मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर मुबलक मासळी मिळेल, अशी मच्छीमार नौका मालकांना आशा होती, ती पूर्णपणे फोल ठरली आहे. मासळी अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याने दर अजून उतरलेले नाहीत.
तापमानात वाढ होऊन कोकणातील मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो असा अंदाज गेले महिन्यातच जाणकार मच्छीमारांनी वर्तवला होता. वातावरण बदलामुळे माशांच्या अधिवासावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोकणच्या सागरी किनारपट्टी पारंपारिकपणे मिळणारे मासे गेल्या काही दिवसापासून कमी होऊ लागले आहेत. त्यावरूनच तापमानात वाढ होणारा असा अंदाज स्थानिक मच्छीमारांनी बांधला होता आणि तो गेल्या एप्रिल महिन्यापासून खरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. तापमान वाढीचे परिणाम मानवाप्रमाणे माशांवर देखील होत असतात. तापमानात वाढ झाल्यामुळे माशांच्या चयापचय क्रियांचा दर वाढतो. त्यामुळे त्यांचा श्वसन दर आणि पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनची गरज वाटते. त्यांच्या आहार आणि पचन सवयी बदलू लागतात. अनॉक्सिक सहनशीलता कमी होते. परिणामी वाढलेल्या तापमान क्षेत्राकडून सागरी माशांचे कमी तापमान क्षेत्राकडे स्थलांतर होते आणि किनारी भागातील मासे दूर राहतात आणि मासे मिळण्याचे प्रमाण कमी होते.
मासेमारीवर परिणाम अन्य घटकात कारखान्यातील रासायनिक पाणी, कचरा, सांडपाणी हे सर्व समुद्रात सोडल्याने माशांवर त्याचा प्रभाव दिसून आला आहे .वाढती जल पातळीचाही परिणाम देखील मासेमारी आणि मत्स्य उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे.
*अखेरच्या टप्प्यात माशांमध्ये घट होण्याची भीती*
कोकणात पर्सेशिन बोटी वगळता ट्रॉलींग आणि गिलनेट सह मासेमारी बोटीची संख्या 30 ते 35हजारांच्या घरात आहे. कोकणात मासेमारी हंगाम सुरू झाल्यावर मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जातात. 15 लाख हुन अधिक कुटुंब मासेमारीवर अवलंबून आहे. महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीत वर्षांकाठी चार ते पाच लाख हजार मॅट्रिक टन इतकी मासेमारी होते, मात्र यंदा त्यामध्ये हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात मोठी घट होण्याची शक्यता मच्छीमार सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान एक जून रोजी सागरी मासेमारी बंद होणार असल्याने केवळ एक महिनाच हातावर असल्याने मच्छीमार बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.