कुंकूच ठरले वैरी, पतीने माहेरी येऊन पत्नीचा गळा आवळून केला खून.

अंकिता दीपक जिचकार वय 25 असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती वरुडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संघरक्षक भगत यांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी मृत अंकिताचा पती दीपक राजेंद्र जिचकार वय 29, रा. सावंगी, ह.मु.टेंभुरखेडा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला शुक्रवारी ता. 5 वरुड पोलिसांनी अटक केली. मागील काही दिवसांपासून जिचकार दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वादविवाद सुरू होता. त्यामुळे पत्नी अंकिता ही माहेरी राहत होती. 12 जानेवारी 2021 रोजी दीपकच्या मेहूणीचा साखरपुडा होता. त्या समारंभाला सुद्धा दीपक याने विरोध केला होता. त्यामुळे त्याच्या सासरच्यांनी त्याला पुन्हा हाकलून दिले होते. त्यावेळी त्याने वाद घालताना काहींना जीवाने मारण्याची धमकी सुद्धा दिली होती, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेच्या दिवशी दीपक पुन्हा गावात पत्नीच्या माहेरी आला. घरात अंकिता आपल्या खोलीत एकटीच असल्याचे बघून दीपकने तिचा आधी दोरीने गळा आवळला. त्याचे समाधान न झाल्यामुळे पुन्हा केबलने गळा आवळून पत्नी अंकिता हिचा खून केला. बाहेर कुणाला दिसू नये यासाठी आतून खोलीचे समोरील दार बंद केले होते. खून करून दीपकने पळ काढला. अंकिता हिच्या भावाने तिच्या खोलीजवळ जाऊन आवाज दिला असता, तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याने मागच्या दारातून बघितले असता मोठी बहीण अंकिता ही घरात मृतावस्थेत त्याला पडून दिसली. मृत अंकिता हिची बहीण अमृता अळसपुरे हिने वरुड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून जावई दीपक जिचकारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली.