रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिकेचा आधार
२२ हजार६१९रुग्णांना दिली सेवा
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- ग्रामीण भागातील रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी गेल्या दहा वर्षांपूर्वी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु करण्यात आली. या रुग्णवाहिकेमार्फत एका कॉलवर सेवा देण्याचे काम केले जात आहे.रायगड जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजारांहून अधिक रुग्णांना सेवा देण्याचे काम या रुग्णवाहिकेने केले आहे. त्यामुळे अपघातापासून वेगवेगळ्या आजारातील रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका आधार बनली आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा किंवा तालुक्याच्या रुग्णालयात नेताना पूर्वी फार मोठी अडचण निर्माण होत असत. रुग्णवाहिकांचा अभाव निर्माण होत असल्याने अनेकवेळा रुग्ण रस्त्यात दगावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात होती. रस्ते अपघातात जखमी झालेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले, गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे प्रकृती बिघाडलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु करण्यात आली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखाली १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकामार्फत तातडीची वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०१४ पासून ही सेवा सुरु आहे. रायगड जिल्ह्यासाठी २६ रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिकेमध्ये अन्य आरोग्य सुविधांसह डॉक्टरही उपलब्ध करण्यात आले. १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यास काही मिनिटांत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे काम रुग्णवाहिका करीत आहे. बीव्हीजी कंपनीद्वारे या रुग्णवाहिकांवर नियंत्रण ठेवले जाते. अलिबाग व अन्य तालुक्यांतून रुग्णांना मुंबई व अन्य दवाखान्यात उपचारासाठी तातडीने नेण्याचे काम १०८ रुग्णवाहिका करते. जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविणे, अशी अनेक प्रकारची कामे रुग्णवाहिकेच्या मदतीने केली जातात.
महाराष्ट्राची जीवनदायी समजल्या जाणार्या या रुग्णवाहिकेने २२हजार ६१९ रुग्णांना सेवा दिली आहे. त्यामध्ये भाजलेले ८५, अधिक उपचारासाठी १६हजार ५४०, आत्महत्या १९, अपघात झालेले ४८२, गरोदर महिला एक हजार ८५७, विषबाधा झालेले ३८५ अशा अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. वेळेवर रुग्णालयात नेऊन त्यांना वाचविण्याचे काम रुग्णवाहिकेने केले आहे.
नव्या रुग्णवाहिकेची प्रतीक्षा
रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रुग्णवाहिका जुन्या झाल्या असून, आतापर्यंत या रुग्णवाहिकांनी साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यामुळे लवकरच या रुग्णवाहिका भंगारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दहा वर्षे जुन्या झालेल्या रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्तीचे काम माणगाव, पनवेल, वडखळ, कोलाड, महाड, अलिबाग या ठिकाणी केले जाते. त्यामध्ये ऑईल बदलणे, इंजिन दुरुस्त करणे, अशी अनेक प्रकारची कामे केली जात आहेत.