अवकाळी पावसाने उडवली सर्वांचीच दाणादाण, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान,
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील ग्रामीण विभागात बुधवार दि. ७ मे रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास जोरदार सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटांसह आलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत होऊन शेतकऱ्यांसह इतर क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिक, विक्रेते, वीटभट्टी व्यावसायिक, आंबा उत्पादक व जनावरांचा चारा, सर्वसामान्य गरीब नागरिकांचे लाकूडफाटा आदींचे मोठ्या प्रमाणात भिजून नुकसान झाले आहे.
लग्नसराई सुरू असल्याने अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे लग्नमंडपात जमलेल्या वर्हाडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली, मंडपात जमलेले वधूवरांसह सगळेच पावसाने ओलेचिंब झाले, यामुळे लग्न असलेल्या मंडपातील वधूकडील मंडळींचे व मंडप व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या झाडांवरील तयार झालेला व हातातोंडाशी आलेला आंबा गळून पडल्याने त्यांचे देखील नुकसान झाले आहे. यासोबतच वीटभट्टी व्यावसायिक यांच्या कच्चा विटा भिजल्याने त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर याठिकाणी विटा बनवण्यासाठी आलेल्या व उघड्यावर राहत असलेल्या मजुरांच्या जीवनावश्यक वस्तू भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जागोजागी सुरू असलेल्या विकासकामे व त्यांच्या बांधकाम साहित्याचे तसेच मजुरांचे देखील नुकसान झाले आहे. एकंदरीतच या आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना सर्वांनाच फटका बसला आहे.
*फोटो लाईन :* अवकाळी पावसामुळे सोगाव येथे भिजलेला लाकूडफाटा व जनावरांचा चारा,