अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे थकीत मानधन लवकरच मिळेल असि. बीडीओ यांचे आश्वासन.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील काही मोजक्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे क्लार्क नसल्याकारणाने तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे थकित असणारे मानधन लवकरात लवकर येत्या १५ दिवसांत त्यांच्या खात्यावर मिळण्याचे आश्वासन असि.बीडीओ तसेच आयसीडीएस प्रकल्प अधिकारी शर्मिला पाटील यांनी दिले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालुक्यातील काही सेविका आणि मदतनीस यांचे तीन ते चार महिन्याचे मानधन तर काहींचे आठ महिन्याचे मानधन काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या खात्यात जमा होत नव्हते. त्यामुळे मानधनाशिवाय आपला उदरनिर्वाह करीत असताना या सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार प्रकल्प कार्यालयात विचारणा होत होती परंतु यावर योग्य तोडगा निघत नव्हता. अखेर ही बाब अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ रायगड जिल्हा अंगणवाडी प्रमुख ॲड . जिविता पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली त्या अनुषंगाने त्यांनी सदरील ही बाब युनियनच्या निदर्शनास आणून दिली असता सरचिटणीस ब्रुजपाल सिंग, अध्यक्ष एम.ए.पाटील, राजेश सिंग यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे रायगड जिल्हा प्रमुख रश्मी म्हात्रे तसेच दिनकर म्हात्रे यांनी मानधन न झालेल्या सेविका, मदतनीस यांच्या समवेत अलिबाग प्रकल्प कार्यालयाला भेट देऊन प्रकल्प अधिकारी शर्मिला पाटील यांच्या समवेत चर्चा केली असता क्लार्क नसल्याकारणाने सदरील मानधन झाले नाही परंतु याबाबत प्रस्ताव तयार आहेत तरी येत्या १५ दिवसात ज्या सेविका, मदतनीस यांचे थकलेले मानधन आहे ते लवकरच मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. सकारात्मक चर्चा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचारी संघ रायगड जिल्हा प्रमुख रश्मी म्हात्रे, दिनकर म्हात्रे तसेच अंगणवाडी सेविका जिल्हा प्रमुख ॲड. जिविता पाटील तसेच उपस्थित सर्व सेविका आणि मदतनीस यांनी प्रकल्प अधिकारी शर्मिला पाटील यांचे आभार व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षिका सामिया पेरेकर उपस्थित होत्या.