शेकापचा पदाधिकारी मेळावा रद्द

शेकापचा पदाधिकारी मेळावा रद्द

राष्ट्रहितासाठी सरकारला पाठींबा राहणार

जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांची माहिती

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय मेळावा रविवारी (दि.11) मे रोजी पेझारी येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे देशातील सैनिकांना पाठींबा देण्यासाठी हा मेळावा रद्द करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा चिटणीस मंडळाने ठराव घेतला आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाल्याची माहिती जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ॲड. गौतम पाटील, सुरेश घरत, अनिल पाटील, वृषाली ठोसर, रश्मी पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुरेश खैरे म्हणाले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्यानंतर केंद्र सरकारने ठोस भूमिका घेत पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ले करून त्यांना प्रति उत्तर दिले. हवाई दल, नौदल व सैन्य दलाने चांगली कामगिरी बजावून पुन्हा एकदा दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवली आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे आपण सर्वजण भारतीय आहोत, ही भूमिका घेऊन आपल्या देशातील सैनिकांना पाठींबा आणि त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात शेतकरी कामगार पक्षाचे विविध कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पक्ष भेद न ठेवता, केंद्र व राज्य सरकारला शेतकरी कामगार पक्षाकडून सहकार्य आणि पाठींबा राहील ही भूमिका घेतली आहे, असे सुरेश खैरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
—————-
सामाजिक बांधिलकीतून गरीब गरजू मुलांना व मुलींना शनिवारी (दि.10) पीएनपी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायकल व दप्तर वाटपाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पाच हजार मुला – मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न आहे. मात्र देशात सध्या युद्धजन्य परिस्थितीचे वातावरण आहे. त्यामुळे देशातील हवाईदल, नौदल व सैन्य दलाला पाठींबा देण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हा कार्यक्रम थाटामाटात साजरा न करता सायकल व दप्तर घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रलेखा पाटील – जिल्हा महिला आघाडी प्रमुख

—————
एक मताने देश व सरकारच्या पाठीशी- ॲड. मानसी म्हात्रे
संपूर्ण देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काश्मीरमध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा प्राण दहशतवाद्यांनी घेतला.पाकिस्तानच्या कुरघोडीला आळा बसावा, म्हणून केंद्र सरकारने विशेषतः संरक्षण खात्याने जी भूमिका घेतली आहे. ती कौतुकास्पद आहे. नऊ दहशतवादी ठिकाणी हल्ले करून पाकिस्तानचा भारत देशाप्रती बघण्याचा डाव उधळून लावला आहे. तिन्ही दलातील सैनिक चोख उत्तर देत आहेत. राष्ट्रप्रेम या ठिकाणी प्रथम आहे. वेगवेगळ्या पक्षाची भूमिका वेगळी असते. मात्र देशाच्या व राष्ट्राच्या संरक्षणासाठी सरकार जी भूमिका घेत आहे, त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. तिन्ही सैनिकांना बळ देण्यासाठी एक मताने देश व सरकारच्या पाठीशी आहोत, असे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले.