ज्येष्ठ कवी मनोहर परब यांच्या ” विरंगुळा ” काव्यसंग्रहाचे परीक्षण .

ज्येष्ठ कवी मनोहर परब यांच्या ” विरंगुळा ” काव्यसंग्रहाचे परीक्षण .

सामाजिक विषयांचा सहज उलगडत जाणारा -विरंगुळा

ज्येष्ठ कवी रामचंद्र परब हे आपला दुसरा काव्यसंग्रह ” विरंगुळा ” घेऊन रसिक वाचकांच्या भेटीला आलेले आहेत. साधारण वीस एक वर्षापूर्वी त्यांचा ” विसावा ” हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता, आणि अल्पावधीतच त्याची दुसरी आवृत्तीही संपली. विसावा काव्यसंग्रहाला रसिक मान्यता मिळाल्या मुळे कवी रामचंद्र परब यांना साहित्य वर्तूळात आणि मित्रमंडळात ” विसावाकार ” म्हणून ओळखले जाते.
आज त्यांचे वय ८१ वर्षे असले तरी काव्य वाचनाच्या माध्यमातून त्यांचा वावर साहित्यिक कार्यक्रमातून/उपक्रमातून आवर्जून असतो. जवळजवळ ३९ वर्षे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातून प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. शिधा वाटप कार्यालय मुंबई आणि शेवटी मोटार वाहन विभाग मुंबई येथे कार्यरत होते. साहजिकच त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे.

” विरंगुळा ” या काव्यसंग्रहात एकूण ६४ कविता असून या माध्यमातून त्यांनी विविध विषय हाताळले आहेत. राजकीय व्यक्तीं बरोबरच अन्य महनीय व्यक्ती , भारत रत्न सचीन तेंडुलकर, महाराष्ट्र भूषण सुनील गावस्कर, कपील देव, सोनोपंत दांडेकर, बाबा महाराज सातारकर, शांताराम गुरूजी, वामनराव पै इ. विभुती आणि त्यांची प्रवचने, किर्तने यावर देखील कविता बेतलेल्या आहेत. आणि त्या आवर्जून वाचाव्यात अशा आहेत.

राजकीय विचार आणि सुदृढ लोकशाही साठी मतदान केलेच पाहिजे, तेही सदसदविवेक बुध्दीचा वापर करुन सर्वोत्तम राजकीय व्यक्तीला निवडून आणा असाही संदेश कवी परब देतात. ते म्हणतात –

भ्रष्टाचारी नेत्यांना द्या धक्का
अभ्यासू, उमदा नेता भांडेल न्याय हक्का
कोणास निवडायचे ? निश्चित करा पक्का
मन तुमचे वापरा, जणू ‘ हुकमी एक्का ‘

या दृष्टीने राजकारणाशी संबंधित आणि तत्सम अशा महात्मा गांधी, मुंडे साहेब, निळुभाऊ खाडिलकर, नोटबंद लय भारी, पवार साहेब, मोदीरूपी मोती, बाळासाहेब , शुभेच्छा, रतन टाटा या कविता वाचाव्यात.

सामाजिक भान राखणार्या, सामाजिक वास्तव आधोरेखित करणाऱ्या काही कविता..जसे – हेल्मेट, कोरोना, व्यवसाय, टाळा एडस, प्लास्टीक , खड्डेच खड्डे, जाळे, काळरात्री, बंद इ.इ. कविता या संग्रहात आहेत. त्या रसिक वाचकांनी आवर्जून वाचाव्यात.

कवी परब यांचे गावावर, गावातल्या झाडापेडावर, गुरा-ढोरांवर आणि त्यांच्या बांबुळी गावावर विलक्षण प्रेम आहे. त्यांच्या गावावरची कविता बघा..

कुडाळच्या उत्तरेस गाव बाबुळी
तिच्या पश्चिमेस मंदिर रामेश्वर-ब्रह्मेश्वर
त्यांच्या शेजारी बाराचा पुरवंश, देवी सातेरी
मूर्ती सुंदर साजिरी गोजिरी….। “

अशी कवितेची सुरुवात करून बांबुळी गाव, तिथली मंदिरे, पुरातन झाडे, तलाव, ओढे नाले, मुलांसाठी बालवाडी आणि रूबाबात फिरणारे गावकरी याचे शब्द चित्र डोळ्यापुढे उभे करतात. तसेच ” माझे बाबा ” ही त्यांची कविता आपल्या वडिलांबद्दलचे प्रेम, आदर, त्यांची शिकवण, त्यांचे मार्मिक बोल, त्यांची धार्मिक वृत्ती , त्यांच्या सोबत भजन प्रवचन आणि किर्तनात दग होणं, नाट्य, संगीत, सभा संमेलना मधून त्यांच्या सोबत फिरणं…या सर्व आठवणी वडिलांनी केलेले संस्कार आधोरेखित करतात.

धार्मिक वृत्ती जोपासणार्या काही कविता जसे- श्री गणराय, श्रीराम, स्वामी समर्थ , श्री गणराज, शिव कृपानंद स्वामी इ. कविता तर….शौर्य आधोरेखित करणाऱ्या रायगडावर, विक्रात, धर्मवीर संभाजी या कविता रसिक वाचकांना आवडतील.

प्रा. प्रवीण दवणे यांनी कवी परब यांच्या या संग्रहाची थोडक्यात प्रस्तावना लिहिली असून ते म्हणतात –
वयाने ज्येष्ठ असलेलेकवी श्री .परब हे अतिशय हौसेने कविता करतात.आणि त्या कवितेतून सामाजिक विचार व्यक्त करतात. त्यांना आदर्श अशा महापुरूषांची एक ओढ वाटते आणि म्हणूनच त्यांच्या कवितेतून समाज अंतर्यामी सुंदर व्हावा अशा प्रकारे चिंतन व्यक्त होत राहते…”
दवणे सरानी अगदी योग्य लिहिले आहे. विरंगुळा हा काव्य संग्रह रसिक वाचकांना नक्की आवडेल असा विश्वास वाटतो.

अशोक लोटणकर

काव्यसंग्रह – विरगुळा
कवी – रामचंद्र परब
मूल्य – रू.१००/-
पृष्ठे – ६६.