राष्ट्रीय लोक अदालतीत ४ हजार ३६१ प्रकरणांचा निकाल

राष्ट्रीय लोक अदालतीत ४ हजार ३६१ प्रकरणांचा निकाल

१९.१७ कोटींची तडजोड रक्कम वसूल

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा जलद व सामोपचाराने निपटारा व्हावा, या उद्देशाने १० मे २०२५ रोजी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण ४ हजार ३६१ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. या प्रक्रियेत पक्षकारांना एकूण १९ कोटी १७ लाख ७८ हजार ५० रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सृष्टी निळकंठ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयामध्ये एकूण ३१ हजार ९६२ प्रकरणे (१९ हजार २२२ वादपूर्व व १२ हजार ७४० प्रलंबित) ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ९४८ वादपूर्व व २ हजार ४१३ प्रलंबित असे ४ हजार ३६१ प्रकरणे निकाली निघाली.

जिल्ह्यात एकाचवेळी २७ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. या प्रक्रियेमध्ये तांत्रिक प्रगतीचा उपयोग करत, पक्षकारांना न्यायालयात प्रत्यक्ष येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलद्वारेही प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये भरविण्यात आलेल्या लोक अदालतांमध्ये एकूण १७ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोडी करण्यात आल्या असून, संबंधित पक्षकारांना एकूण १ कोटी ५८ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.

*पाच संसारांना नवे वळण*
या लोक अदालतीच्या माध्यमातून वैवाहिक वाद मिटविण्यात देखील मोठे यश मिळाले. रोहा (१), महाड (२) आणि पनवेल (२) येथील एकूण पाच जोडप्यांमध्ये सामंजस्य घडवून आणून त्यांचे संसार पुन्हा सुरू होण्यास मदत झाली.

या यशस्वी उपक्रमासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक व सर्व पोलीस कर्मचारी तसेच सहभागी पक्षकार यांनी सहकार्य केले.

या उपक्रमाबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सृष्टी निळकंठ आणि सचिव न्यायाधीश श्री. अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले व लोक अदालतीच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.