नद्यांमधील गाळ “जैसे थे”
२१ कोटीचा प्रस्ताव; काम नझाल्याने किनारी गावांना पुराचा धोका
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मुसळधार पावसाने डोंगर माथ्यावरील दगड गोटे मोठ्या प्रमाणात वाहून नद्यांमध्ये येतात. सावित्री, गांधारी,काळ या प्रमुख नद्यांमध्ये गाळ साचून राहिल्यास पुराचा धोका उद्भवतो. हा धोका कमी करण्यासाठी दरवर्षी नदीपात्रातील गाळ काढण्याचा प्रस्ताव पाठवला जातो. यंदाही २१ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हा गाळ केव्हा काढणार, असा प्रश्न दरवर्षी पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
पाटबंधारे विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नद्यांमध्ये गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेला मंजूर देण्यात आली. त्यानुसार काही दिवसात विविध प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास रायगड पाटबंधारे विभागाची कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी व्यक्त केला आहे.
विशेषतः सावित्री, काळ आणि गांधारी नद्या मुळे पूर परिस्थिती उद्भवत असते. त्यामुळे याच नद्या मधील १०.५० क्युबिक मीटर गाळ काढण्याची उद्दिष्ट ठेवली आहे. २० दिवसात काम पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु ‘ दिवस थोडे आणि सोंग’ जास्त अशी परिस्थिती पाटबंधारे विभागाची झाली आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असून नद्या तुडुंब वाहण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आतापर्यंत गाळ काढण्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. आता निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश काढणे व त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केव्हा होईल असे प्रश्न अधांतरी आहेत.
प्रमुख नद्यांमधून गाळ काढण्यास अद्याप सुरवात न झाल्याने पूरग्रस्त चिंतेत असले तरी यावर्षी काम न झाल्यास राहिलेला गाळ पुढच्या वर्षी काढण्याचा प्रयत्न असेल असे मिलिंद पवार यांचे म्हणणे आहे. यावरून पाठबंधारे विभागाचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवन्यात दंग असल्याचे दिसून येत आहे.
महाड, पोलादपूर प्रमाणे रोहा, नागोठणे, पेण, माणगाव तालुक्यात नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी पूर सदृश्य स्थितीचा सामना करावा लागतो. गतवर्षी गांधारी आणि सावित्री नदीतील गाळ थोड्याफार प्रमाणात करण्यात आला होता. तर जिल्ह्यातील अन्य नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष जैसे थे आहे. गाळामुळे जिल्ह्यातील कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, अंबा अशा नद्यांच्या पत्रात बदल होत असल्याचे दिसते.
जिल्ह्यातील १२८ गावांना धोका
रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३१२६ मिलिमीटर पावसाची नोंद होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगावरून हे पाणी वेगाने खाली येते. डोंगर उतारावरून पाण्यासोबत दगडगोटे मोठ्या प्रमाणात वाहून येतात. पावसाळ्यानंतर हे दगडगोटे नदीपात्रात साचून राहतात. सतत गाळ साचत गेल्याने नदीपात्र उथळ होते. त्यामुळे किनारालगत गावांना दरवर्षी पूरस्थितीला सामोरे जावे लागते. जिल्ह्यात पुराचा धोका असणारीव१२८ गावे आहेत. त्याचबरोबर रोहा, नागोठणे, महाड या शहरांना दरवर्षी पुराचा तडाका बसत असतो .पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी नद्यांमध्ये गाळ काढणे ही एक महत्त्वाची उपाय योजना आहे.
गाळ काढणे का महत्वाचे,,?
सर्वाधिक पाऊस कोसळणाऱ्या कोकणातील नद्या सध्या गाळाने भरलेल्या आहेत. अतिवृष्टी,भरावामुळे त्यांचे प्रवाह हीबदलले आहेत. नदीतील काळ काढायचा म्हटलं तर पाटबंधारे विभाग परवानगी देत नाही. वाळू असल्यामुळे महसुली त्यावर रॉयल्टी मागते. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्यात यावा त्यामुळे नद्या मोकळा श्वास घेतील. आणि पावसाळ्यातील हानी ही टळेल अशी मागणी किनारी भागातून स्थानिकांकडून होत आहे.