रत्नाकर पाटील
मो: ९४२०३२५९९३
अलिबाग:- काश्मीर मधील पेहलगाम येथे घडलेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे व त्यानंतर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे आरसीएफ कॉलनीत राहणा-या इसमांव्यतिरिक्त अन्य नागरिकांना कॉलनीत येण्यापासून आर.सी.एफ.ने बंदी घातलेली आहे. त्याबाबत महाराष्ट् प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस अॅड.प्रविण ठाकूर यांच्यासह अन्य स्थानिक प्रतिष्ठीत नागरिक, राजकीय व्यक्ती संस्था यांनी आर.सी.एफ.कडे नागरिकांना पुर्ववत कॉलनीत जाण्यास परवानगी दयावी अशी विनंती केलेली आहे. परंतू अद्यापही नागरिकांना कॉलनीत येण्यास मज्जाव केला जात आहे. सदर बाब दुर्देवी आहे. तसेच त्याचे पडसाद देखील सर्वत्र उमटत आहेत. त्यामुळे महाराष्ट् प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस अॅड.प्रविण ठाकूर यांनी आज तालुका कॉंग्रेस उपाध्यक्ष मनोहर म्हात्रे, प्रकाश पाटील, स्वप्नील ठकेकर यांच्या समवेत आर.सी.एफ.व्यवस्थापनाची भेट घेवून त्यांचेशी चर्चा केली व लेखी निवेदन दिले. याबाबत लवकरात लवकर आर.सी.एफ.ने घेतलेल्या निर्णयाबाबत आपणास कळविण्यात येईल असे आश्वासन यावेळी अॅड. प्रविण ठाकूर यांना देण्यांत आले.
यावेळी आर.सी.एफ.तर्फे महाव्यवस्थापक हिरडे, जनरल मॅनेजर हर्डीकर, डेप्युटी जनरल मॅनेजर विनायक पाटील, अॅडमिन मॅनेजर महेश पाटील व जनसपंर्क अधिकारी राकेश कवळे हे उपस्थित होते. अॅड.प्रविण ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये आरसीएफ कॉलनी वेश्वी कुरूळ येथे आरसीएफ कर्मचा-यांकरिता निवासी सुविधा निर्माण केलेली आहे. तेथून आरसीएफ प्रकल्प हा सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. सदर आरसीएफ कॉलनीमध्ये वर्षानुवर्षे वेश्वी, कुरूळ, अलिबाग व सभोवतातील नागरीक मॉर्निंग वॉक करिता जात येत असतात. सदर नागरिकांकडून आरसीएफ कॉलनी अथवा रहिवाश्यांना कसलाही त्रास नाही. प्रत्यक्षात यामुळे सभोवतातील नागरीक यांचा व्यायाम होवून त्याचे शरीर, मन सुदृढ होते. तसे पाहता सुमारे चाळीस वर्षीपेक्षा जास्त कालावधीपासून सदर ठिकाणी नागरीकांना जाण्यायेण्यास कधीही प्रतिबंध केला गेला नाही. तसेच नागरीकांकडून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. असे असतानाही स्थानिक नागरिकांना आत जाण्यायेण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच गेट लावण्यात आलेले आहेत व आत कोणासही प्रवेश दिला जात नाही. प्रत्यक्षात आरसीएफ प्रकल्प तसेच कॉलनी ही स्थानिक माणसांच्या जमिनी घेवून निर्माण करण्यात आलेला आहे. आजमितीस युध्दजन्य परिस्थती नाही. तसेच आरसीएफ कॉलनीत कोणताही प्रकल्प नाही, किंवा आरसीएफ कॉलनीत येणा-या नागरिकांकडुन आरसीएफ कॉलनीला कसलाही धोका नाही. आपण सुरक्षीततेची काळजी म्हणून येणा-या जाणा-या नागरिकांची गेटवर तपासणी करून त्यांस आत सोडण्यास नागरिकांची कोणतीही हरकत नसावी तसेच सदर नागरिकांच्या आत येण्याने फिरण्याने व्यायाम करण्याने, उठण्या बसण्याने आरसीएफ कॉलनीला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी नागरिक नक्कीच घेतील. तरी आरसीएफ कॉलनीमध्ये येण्याजाण्याकरिता स्थानिक नागरिकांना केलेली बंदी मागे घेण्यात यावी तसेच त्यांस आरसीएफ कॉलनीमध्ये येण्याकरिता परवानगी द्यावी अशी विनंती अॅड.प्रविण ठाकूर यांनी या भेटीमध्ये केली आहे.