बोगस बियाणे, खत विक्रीवर करडी नजर; कृषी विभागाची भरारी पथके
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- खरीप हंगामात रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध व्हावीत त्याचा काळाबाजार होऊ नये किंवा बोगस बियाणे, खते विकून फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पदके व तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.शिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.
जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत. आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असून पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली असून समिती खते बियाणे व कीटकनाशकांच्या प्राप्त तक्रारीची दखल घेऊन आवश्यक कारवाई करेल.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 56 हजार 10 हेक्टर क्षेत्रासाठी एकूण पाच हजार 191 क्विंटल बियाणे आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी 12 हजार 907 मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा सभेमध्ये शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे वितरण मोहीम राबविन्याच्या सूचना दिल्या असल्याने चालू खरीप हंगामात कृषी विभागामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या परिस्थितीत जिल्ह्यात बियाणे व खते पुरवठा सुरळीत झाला असल्याचे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी 8830264335 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करता येईल. सर्व कृषी साहित्य विक्रेत्यांना कृषी सेवा केंद्रांमध्ये तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक, भाव फलक ,साठा फलक, परवाना तसेच सदर कृषी सेवा केंद्रामध्ये लिंकिंग केले जात नाही अशा आशयाचा फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कृषी साहित्य विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.