शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा
– डॉ. रवींद्र मर्दाने
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी भातानंतर भात ऐवजी भातानंतर भाजीपाला,भातानंतर कडधान्य ही पीक पद्धती अवलंबून त्यास कुक्कुटपालन, शेळीपालन,दुग्धव्यवसाय,मत्स्यपालन अशा कृषिपूरक उद्योगांची जोड देत यांत्रिकी पध्दतीचा वापर करीत एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा, असा सल्ला कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी दिला .प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ विकसित कृषी संकल्प अभियान ‘ अंतर्गत माणगाव तर्फे वरेडी या गावात आयोजित जनजागरण कार्यक्रमात ते बोलत होते .
व्यासपीठावर कनिष्ठ भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई, प्रभारी तालुका अधिकारी हेमांगी सपकाळे,पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय चव्हाण,कृषी विस्तार अधिकारी देविदास राठोड, मंडळ कृषी अधिकारी सचिन केने, उप कृषी अधिकारी मंगेश गलांडे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.मर्दाने यांनी विद्यापीठाने विकसित व शिफारस केलेल्या विविध भात बियाणांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देत शेतकऱ्यांनी त्याचीच लागवड करावी,असे आवाहन केले.शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासोबतच भारतीय कृषिला आधुनिक,स्वयंपूर्ण बनविणे,हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून शेतकऱ्यांची पंढरी असलेल्या कृषी विद्यापीठांना शेतकऱ्यांनी भेटी द्याव्या व नवनवे तंत्रज्ञान जाणून घेऊन विविध शिफारसींची अंमलबजावणी करावी,असे त्यांनी नमूद केले.
यावेळी सचिन केने ,संजय चव्हाण, देविदास राठोड ,हेमांगी सपकाळे यांनी कृषिशी निगडित शासनाच्या विविध योजनांचा उहापोह करीत प्रस्तावांचे व दाव्यांचे बारकावे विशद केले.डॉ. गवई यांनी पोषणमूल्य असलेल्या भात जाती व ग्राम बीजोत्पादनबद्दल माहिती दिली.