मांडवा बंदरावर दोन गटात वाद
जिल्हा रुग्णालयात चारजण उपचारासाठी दाखल
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरावर दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये चौघेजण जखमी झाले असून अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुचाकीची कट मारण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मांडवा पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार रात्री पावणे अकराच्या सुमारास मांडवा बंदराजवळ दोन दुचाकी चालवीत असताना कट मारण्यावरून दोन गटात भांडण झाले. हा वाद विकोपाला पोहचला. एकमेकांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, कोळगाव आणि बोडणी येथील 40 ते 50 मंडळी त्या ठिकाणी जमली होती. या घटनेची माहिती मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांना समजताच अमलदारांसह ते घटनास्थळी पोहचले.कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून योग्य तो बंदोबस्त त्या परिसरात ठेवण्यात आला. जमावाला शांत करून होणारा भीषण वाद रोखण्यास पोलिसांना यश आले. याप्रकरणी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.