अलिबाग वडखळ मार्गावर अवजड वाहतुकीचे नियमन होणार, जिल्हाधिकारी किशन जावळे यांची ग्वाही

57

वडखळ महामार्गावर वाहतूक विकेंण्डच्या दिवशी नियंत्रित केली जाणार

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ 
मो: ९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग वडखळ महामार्गावर शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या मार्गावरील अवजड वाहतुकीचे नियमन केले जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव घेऊन या संदर्भातील वाहतूक नियमन अधिसूचना काढली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दर विकेंण्डला अलिबागमध्ये हजारो पर्यटक येत असतात. त्यामुळे अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढते. त्यामुळे दर शनिवार रविवारी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळतात. २५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दिड ते दोन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो. वाहनचालक आणि प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. बेशिस्त वाहन चालक आणि अवजड वाहने या वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर काढत असतात. ही बाब लक्षात घेऊन शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांच्या कालावधीत या मार्गावरील अवजड वाहतूकीचे नियमन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Raigad latest news
raigad latest news

वडखळकडून अलिबागच्या दिशेने येणारी आणि अलिबागकडून वडखळच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक विकेंण्डच्या दिवशी नियंत्रित केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून या संदर्भातील प्रस्ताव मागविण्यात आला असून, हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वाहतूक नियमन अधिसूचना प्रसिध्द केली जाईल असेही त्यांनी सांगीतले. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.