जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जेकब जुमा यांनी राजीनामा दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत राजकीय भूकंप आला आहे. या राजकीय भूकंपामागे तिथले राजकारणी किंवा जनता कारणीभूत नसून उत्तर प्रदेशातील अजय, अतुल आणि राजेश गुप्ता या तीन बंधूचा या भूकंपामागे हात आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या पोलीस आणि भ्रष्टाचार विरोधी पथकाने गुप्ता बंधूंच्या घर आणि कार्यालयावर छापे मारण्यास सुरुवात केली आहे.
अजय, अतुल आणि राजेश हे तिघेही गुप्ता बंधू मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील आहेत. अतुल गुप्तांच्या पुढाकाराने गुप्ता परिवार १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेला आला होता. याच काळात वर्षभरातच नेल्सन मंडेला यांनी देशातील पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत विजय मिळविला होता. लोकशाही स्थापन झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने विदेशी गुंतवणुकीला दारं मोकळी करून दिली होती. त्याचा फायदा घेत भारतात छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या गुप्ता कुटुंबाने काही दिवसातच दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या व्यवसायाचे साम्राज्य उभे केले. त्यांनी संगणक, खाण, मीडिया, तंत्रज्ञान आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. गुप्ता ब्रदर्सने आपल्या कंपन्यांमध्ये जुमा यांच्या कुटुंबीयांना सहभागी करून घेतले आणि खासदारांना लाच देण्याचा प्रयत्नही केला. खासदारांनी गुप्ता ब्रदर्सच्या या लाचखोरीचा पर्दाफाश केल्यानंतर जेकब जुमा अडचणीत आले आणि त्यांना राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
असा झाला प्रवास…
या कुटुंबाने २०१० मध्ये ‘द न्यूज एज’ नावाचं एक वृत्तपत्रही काढलं. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जेकब जुमा यांचं समर्थन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुप्ता कुटुंबाने २०१३ मध्ये ‘एएनएन-७’ नावाचे २४ तास चालणारे एक चॅनलही लॉन्च केलं. याच काळात त्यांची राजकारण्यांबरोबरची उठबसही वाढली. जुमा राष्ट्रपती बनण्याआधी २००९ मध्येच गुप्ता कुटुंबीयांने अफ्रिकन नॅशनल काँग्रेसशी जवळीक साधली होती.