दिलीप भोईर यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय का घेतला?

178

आमदार महेंद्र दळवी यांच्याशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले

अँड.रत्नाकर पाटील, रायगड ब्यूरो चीफ 

मो: ९४२०३२५९९३

अलिबाग:- विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करत भाजपच्या दिलीप भोईर यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्या विरोधात अलिबाग मुरुड विधान सभा मतदार संघात निवडणूक लढवली होती. आता तेच दिलीप भोईर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. महेंद्र दळवी यांच्याशी जुळवून घेण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले आहे. उद्या त्यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

विधानसभा निवडणूकीत अलिबाग मतदारसंघातून निवडणूक लढवता यावी यासठी दिलीप भोईर यांनी मोर्चेबांधणी केली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबागमध्ये दिलीप भोईर हेच भाजपचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. पण युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आला.आणि भोईर यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे भोईर यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

भाजपची एक मोठी फळी निवडणूकीत त्यांच्यासाठी कार्यरत होती. त्यामुळे अलिबाग मध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणूकीप्रमाणे उरण पॅटर्न वापरला जात असल्याची चर्चा सुरू होती. (महेश बालदी यांना अपक्ष उभे करून भाजपने उरण मध्ये शिवसेनेच्या मनोहर भोईर यांचा पराभव केला होता. निवडून आल्यावर ते भाजपमध्ये सामिल झाले होते.)

भाजपमध्ये राहून दिलीप भोईर यांनी मतदारसंघाची चांगली बांधणी केली होती. त्यामुळे भोईर यांच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या अडचणी वाढल्या होत्या. निवडणूक काळात सहानभूतीच्या लाटेवर स्वार होत भोईर वातावरण निर्मिती करण्यात चांगलेच यशस्वी ठरले होते. प्रामुख्याने आदिवासी आणि कोळी समाजात ते प्रचंड लोकप्रिय असल्याचे पहायला मिळाले होते. मात्र दोन प्रस्तापित आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवारांपुढे त्यांची यंत्रणा कमी पडली.आणि निवडणूकीत त्यांना पराभवाला झाला. मात्र ३३ हजार मते मिळवून त्यांनी शेकाप आणि शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मोठा धक्का दिला होता. पक्षाच्या आदेशा विरोधात जाऊन, निवडणूक लढवल्याने, भाजपने भोईर यांची निवडणूक काळात हकालपट्टी केल्याचे जाहीर केले होते.

Dilip bhoir alibaug shivsena

निवडणूकीनंतर पुन्हा भाजपमध्ये जाण्यासाठी पुन्हा प्रयत्न करत होते. विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर हे देखील त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी प्रयत्नशील होते.

 मात्र प्रदेश कमिटीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडीत उर्फ सुभाष पाटील, आस्वाद पाटील आणि चित्रा पाटील हे भाजपमध्ये दाखल झाल्याने भोईर यांच्या अडचणी अधिकच वाढल्या. अडीच वर्षांपूर्वी आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांच्या जिल्हा परिषदेतील हस्तक्षेपाला कंटाळून भोईर यांनी शेकाप मधून भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे भोईर यांनी भाजपमध्ये पुन्हा सक्रीय प्रयत्न सोडून दिले. आणि ज्या महेंद्र दळवींविरोधात निवडणूक लढवली, त्यांच्याशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले.

आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी शिवसेनेची वाट धरल्याची चर्चा या निमित्ताने सूरू झाली आहे.