अलिबाग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची योगासने

अलिबाग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची योगासने

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा; स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण कार्यक्रम

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)-2 अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतमध्ये योगासने, परिसर स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रमास ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) शुभांगी नाखले यांनी सांगितले. राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सहकार्याने प्रत्यक्षात योजनेच्या ठिकाणी तसेच ग्रामपंचायत स्तरावर योगासने, आरोग्य मार्गदर्शन, परिसर स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात आले.”

या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संगम व हरित संगम हे दोन उपक्रम जनसहभाग आणि मोठ्या प्रमाणावर योग प्रात्यक्षिकांची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्त्या यांच्या सहकार्याने जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) टप्पा – 2 संबंधित लाभार्थ्यांची बैठक, कार्यक्रमाआधी परिसर व पाणी स्वच्छता आरोग्य संबंधित पायाभूत सुविधा स्वच्छ करणे आदी उपक्रमही राबविण्यात आले.