‘आषाढी’साठी रायगडमधून सोडणार 60 एसटी बस
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- वारक-यांच्या वारीसोबत नाचत- गात आषाढी एकादशीला विठूरायाच्या चरणी लीन होण्याची इच्छा सर्वांचीच असते. मात्र अनेकदा वयामुळे, आरोग्यामुळे अनेकांना हे शक्य होत नाही. त्यामुळे थेट आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर गाठत भक्तजन आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेत असतात. अशा भक्तांचा आपल्या विठूरायापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर व सोपा व्हावा यासाठी राज्य एसटी महामंडळातर्फे दरवर्षीच खास नियोजन करण्यात येते. त्यानुसार रायगड जिल्हयातूनही एकूण आठ आगारातून पंढरपूरला जाण्यासाठी 60 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे भक्तांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा वाहतूक नियंत्रक दीपक घोडे यांनी केले आहे.
दरवर्षी रायगडातून हजारो भाविक आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. अनेकदा खासगी बसेस करून तर कधी सार्वजनिक वाहनाने हे भाविक पंढरपूर गाठत असतात. खासगी वाहनातून जाणे अनेकदा खर्चिक असते. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षी राज्य एसटी महामंडळाकडून आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणा-या भक्तांसाठी ज्यादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार जिल्हयातूनही एकूण आठ आगारातून पंढरपूरला जाण्यासाठी 60 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये काही सवलतीही देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या गावातील 40 किंवा त्याहून जास्त भाविकांनी एकत्र बुकिंग केले तर त्यांच्यासाठी स्वस्त दरात गावातूनच बस सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरला जाउन दर्शन झाल्यानंतर या भाविकांना पुन्हा त्याच बसने आपल्या गावात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वर्षी 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्याच्या काही दिवस आधीच बसेस सोडण्यात येणार आहेत.
याबाबत जिल्हा वाहतूक नियंत्रक दिपक घोडे यांनी सांगितले की, रायगड जिल्हयातून एकूण 60 बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत. सध्या एकही ग्रुप बुकिंग आलेले नाही. मात्र तसे बुकिंग केल्यास बस उपलब्ध करून देण्यात येईल.
चैकट:
महिलांना 50 टक्के सवलत कायम:
गावागावातून अशा देवदर्शनासाठी महिलांचे ग्रुप अनेकदा मोठया संख्येने निघतात. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूला जाण्यासाठी एसटी बसचे ग्रुप बुकिंग करताना महिलांना एसटी प्रवासात तिमिट दरामध्ये असणारी 50 टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 75 वर्षांपेक्षा जास्त वय असणा-या ज्येष्ठांना मोफत प्रवास असणार आहे.