विद्यार्थ्यांची होणार जात प्रमाणपत्र पडताळणी

विद्यार्थ्यांची होणार जात प्रमाणपत्र पडताळणी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नऊ दिवस विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. अकरावी व बारावी विज्ञान शाळेत शिक्षण घेत असलेल्या, पुढील उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी केली जाणार आहे. 26 जूनपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून, चार जूलैपर्यंत ही मोहिम राहणार आहे. या कालावधीत त्रुटीची पुर्तता करण्याबरोबरच नव्याने प्रस्ताव सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र, पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य जयंत चाचरकर यांनी दिली.
अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेणारे तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याची लगबग सूरू झाली आहे.अलिबागमधील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात अर्ज जमा करण्यापासून जमा केलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यावर लक्ष दिले जात आहे. त्यासाठी लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी पालकांसह विद्यार्थी तहसील कार्यालयापासून तलाठी कार्यालय, शाळा, महाविद्यालयात धावाधाव करीत आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रायगड जिल्हयात विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. 26 जून ते 4 जुल या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये, म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
11 वी व 12 वी विज्ञान शाखेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेणारे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही मोहिम आहे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी अनेक विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येत नाही, ही अडचण लक्षात घेता ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला नाही त्यांनी त्वरित आपल्या मूळ जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.