कचऱ्याच्या ट्रकला मोपेड धडकल्याने युवकाचा मृत्यू झाला तर महिला आणि १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
नागपूर.भांडेवाडी डम्पिंग यार्डजवळील धर्मकाट्याजवळ वळण घेणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकला मोपेड धडकल्याने युवकाचा मृत्यू झाला तर महिला आणि १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता.२७) सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास घडली.नितीन कस्तुरचंद पंचेश्वर (वय २०, रा. बिडगाव) असे मृत युवकाचे नाव तर तारा भरत गाडेकर (वय ४०) व बालक आदर्श शिवराज पाचे (दोन्ही रा. बिडगाव) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डम्पिंग यार्ड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे.
नितीन हा तारा गाडेकर आणि त्यांचा भाचा आदर्श यांच्यासह बिडगाव येथून हिवरीनगर येथे असलेल्या रेशनच्या दुकानात धान्य आणण्यासाठी घराकडून निघाला. तो भांडेवाडी परिसरात आल्यावर अचानक महापालिकेचा कचरा संकलन करणारा एमएच ४९ एटी ६०९२ क्रमांकाचा ट्रक डम्पिंग यार्डजवळील धर्मकाट्याकडे वळला. त्यामुळे अचानक समोर ट्रक आल्याने त्याची एमएच ४९ सीजे ४१८० क्रमांकाची मोपेड त्यावर आदळली.
धडक इतकी भीषण होती की नितीनचा जागीच मृत्यू झाला, तर तारा आणि आदर्श गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाने कोणताही इशारा न देता अचानक वळण घेतले. त्यामुळे दुचाकीस्वार नियंत्रण सुटले व ट्रकवर आदळला.
घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, जखमींना तात्काळ पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकचालक दिनेश कृष्णराव धावडे (वय ४४, रा. बजरंगनगर, कुंभारटोली,नंदनवन) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे.