रेवस बंदरावर डिझेल तस्करी; मांडवा पोलिसांची कारवाई

रेवस बंदरावर डिझेल तस्करी; मांडवा पोलिसांची कारवाई

आरोपी हा डिझेल माफिया राजू पंडीतचा साथीदार

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- मासेमारीच्या नावाखाली डिझेलची तस्करी करणाऱ्या एका बोटीवर मांडवा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी कारवाई केली. या कारवाईत 14 लाख 30 हजार रुपये किंमतीचा पाच हजार लिटर इतका डिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा आरोपी डिझेल माफिया राजू पंडित याचा साथीदार असल्याची माहिती समोर येत आहे. साळाव खाडीत डिझेल तस्करीप्रकरणी यापूर्वीदेखील गणेश कोळी याच्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील सहा महिन्यापूर्वी जिल्ह्यातील मांडवा, रेवदंडा, अशा वेगवेगळ्या बंदरावर डिझेलची मोठी तस्करी सुरू होती. बोटी मार्फत डिझेल किनारी आणून तो एका गाडीत भरून अन्य ठिकाणी त्याचे वितरण केले जात होते. डिझेलच्या अवैध धंद्यामुळे सागरी सुरक्षा धोक्यात आली होती. स्थानिक पोलिसांनी या अवैध धंद्यावर कारवाई केल्यास त्यांच्यावर राजकीय दबाव दिला जात होता. डिझेल माफियांना राजकीय वरदहस्त मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांची कारवाई करण्याची हिंम्मत होत नव्हती. मासेमारीच्या नावाखाली डिझेलची तस्करी सूरू होती. सीमा शुल्क विभागाने या तस्करीवर कारवाई करीत 32 हजार, चार आणि पाच हजार लिटर क्षमतेचे पाच टँकर व दोन मासेमारी बोटी ताब्यात घेतल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होता. डिझेल माफियांचीदेखील गुंडगिरी वाढली होती. त्यामुळे नागरी सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता.

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळाव खाडीमध्ये एका बोटीद्वारे डिझेलची तस्करी झाली होती. 27 ऑगस्ट 2023 मध्ये पहाटेच्यावेळी हा गोरखधंदा सुरू होता. याप्रकरणी गणेश कोळीसह राजू पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कृषीवलने या डिझेल तस्करीविरोधात आवाज उठविल्याने काही प्रमाणात या अवैध तस्करीवर अंकुश राहिला होता. मात्र पुन्हा डिझेल माफिया सक्रिय झाल्याचे चित्र समोर आले आहे. रेवस बंदरावर एका बोटीतून डिझेलची तस्करी होत असल्याची महिती मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांना मिळाली. शुक्रवारी सकाळी त्यांच्या पथकाने बोटीवर छापा टाकला. पाच ते सहा बोटींची तपासणी केली. त्यामध्ये श्रीसमर्थ कृपा बोटीमध्ये हजारो लिटर डिझेलचा साठा दिसून आला. पोलिसांनी तो साठा जप्त करीत डिझेलची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईने पुन्हा डिझेल तस्करीने डोकेवर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे रायगडच्या एसपी डिझेल माफियांविरोधात काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.