प्रेमभंगाच्या रागातून प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल ओतून जाळले, तरुणीचा अखेर मृत्यू.
राज शिर्के प्रतिनिधी
मुंबई:- प्रेमभंगाच्या रागातून 24 वर्षांच्या तरुणीला तिच्या प्रियकराकडून पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आले होते. त्यात प्रियकराचा रविवारी मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी तरुणीनेही रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
निलिमा पाचखळे ही जोगेश्वरीतील गांधीनगर, जनता कॉलनीतील सावरकर चाळीत आपल्या भावासोबत राहायला आली होती. तिचे विजय नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. विजय हा तिच्या वहिनीचा भाऊ होता. ते दोघेही एकमेकांना भेटत होते. मात्र, विजयचा स्वभाव तिच्या घरच्या लोकांना आवडत नव्हता. त्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधाला आणि लग्नाला तिच्या घरातून विरोध होता. याबाबत त्यांनी या दोघांचीही समजूत काढली होती. त्यानंतर तिने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विजय हा तिचे सतत मानसिक शोषण करीत होता. तिला तसेच तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत होता.
रविवारी विजय खांबे 30 नामक व्यक्तीने त्याच्या प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत खांबे हादेखील आगीत होरपळला ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. तर तरुणीला जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करत नंतर जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तरुणी 80% भाजल्याने तिची स्थिती नाजूक होती. उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी तिची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्याने तरुणीने खांबेशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. याच रागातून अखेर तिला जीव गमवावा लागला. व्हेलेंटाईन विकमध्येच ही सुन्न करणारी घटना समोर आल्यामुळे मुंबईत खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होते आहे.