कोर्लई समुद्र किनाऱ्यावरील संशयास्पद बोटीचे गुढ कायम
बोट पाकिस्तानी असल्याचे संशय:वाहनांची पोलीसांनी कसून तपासणी सुरु
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मुरुड तालुक्यातील कोर्लई गावापासून दोन सागरी मैलावर रविवारी रात्री एक बोट संशयास्पदरित्या आढळून आल्याची चर्चा आहे, त्यामुळे कोर्लई परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.
मुरुड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यातील दिपगृहापासून समुद्रात सुमारे दोन सागरी मैल अंतरावर रात्रीच्या सुमारास एक बोट संशयास्पदरित्या आढळून आली. ही बोट रेवदंडा जवळील थेरोंडा समुद्र किनाऱ्यावर येऊन गेल्याची चर्चा आहे. रात्री बोटीवरील लाईट्स दिसून येत होते. मात्र वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे बोटी पर्यंत पोहोचणे शक्य झालेलं नाही. बोट भरकटून भारतीय सागरी हद्दीत आली, की दहशतवादी कारवाईसाठी बोटीचा वापर करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सागरी रात्रीपासून पोलीसांनी मुरुडसह अलिबाग परिसरात कोंबिंग ऑपरेशनला सुरूवात केली आहे. रात्रीपासूनच अलिबाग परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पोलीसांनी कसून तपासणी सुरु करण्यात आली.
बोट पाकिस्तानी असल्याचे स्थानिक मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे मच्छीमार आणि स्थानिक नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण आहे. नौदल, तटरक्षक दलाची मदत घेऊन बोटी पर्यंत पोहचण्याचे प्रयत्न केले जात आहेत. रायगड जिल्हा हा सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. १९९२ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांसाठी वापरण्यात आलेली स्फोटके ही रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी समुद्र किनाऱ्यांवर उतरवण्यात आली होती. तर अजमल कसाब आणि त्यांचे सहकारी मुंबईत हल्ल्यासाठी बोटीनेच दाखल झाले होते. त्यामुळे संशयित बोट आढळल्याची चर्चा सुरू झाल्याने, सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर आल्या आहेत.
सकाळपासून पोलीसांच्या शिघ्र कृती दल कोर्लई समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले आहे. सकाळी यंत्रणांनी बोटीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्यामुळे बोटीचे गुढ कायम आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी थेरोंडा येथे स्थानिकांची बैठक बोलवली असून, त्या ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.