अंगणवाडी गुणवत्ता विकास प्रक्षीक्षण संपन्न
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी सेविकांसाठी दोन दिवसीय अंगणवाडी गुणवत्ता विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात अंगणवाडी सेविकांना ६ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक माहिती विविध प्रत्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आली. हे प्रशिक्षण शिबीर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महिला व बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले.
८ व ९ जुलै रोजी अलिबाग तालुक्यात अंगणवाडी गुणवत्ता विकास प्रशिक्षण शिबीर पार पडले. प्रशिक्षणात ० ते ३ व ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासावर तसेच समाज आणि मातांचा बालविकास प्रक्रियेत सहभाग वाढवून अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला. ‘नवचेतना’, ‘आधारशीला’ आणि माता गट बांधणी व सक्षमीकरण हे तीन प्रमुख घटक प्रशिक्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या प्रशिक्षणात सर्व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मधील सर्व बिटच्या पर्यवेक्षिका तसेच सेविका याना प्रशिक्षण देणेत आले असून, त्यांच्यामार्फत उर्वरित सर्व अंगणवाडी सेविकाना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अंगणवाडीतील बालकांचा पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर भर देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी ८ जुलै रोजी प्रशिक्षण शिबिरास भेट देत अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे स्मिथिन ब्रीद, तसेच जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सोमराज गिरडकर, शंकर पौळ, भोजराज क्षीरसागर यांनी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले.
………………..