स्वराज्याचा स्वामींनिष्ठ शिलेदार नरवीर शिवाजी काशिद 

113

स्वराज्याचा स्वामींनिष्ठ शिलेदार नरवीर शिवाजी काशिद 

संकलन : संजय पंडित 

छत्रपती शिवरायांचा स्वामींनीष्ट असलेला जिगरबाज मावळा वीर शिवाजी काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.

दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.

वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी

narvir shivaji kashid
स्वराज्याचा स्वामींनिष्ठ शिलेदार नरवीर शिवाजी काशिद

शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले होते.

 

दि. १२ जुलै १६६०, आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवाजी काशीद निघाले.

पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते.

झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखाकत होत्या, पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली.

जौहरच्या गस्ताच्या सैनिकांनी त्यांना पाहिले. आरडाओरडा करीत ते तंबूच्या दिशेने धावले. काही वेळातच सगळा तळ जागा झाला. जौहर रागाने लालेलाल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मुर्ख बनविल्याची भावना त्याला क्षणाक्षणाला झाली. जौहरच्या हत्यारबंद सैनिकांच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांना पकडले.

शिवा काशीद यांची पालखी सिद्धी जौहरच्या समोर नेण्यात आली इकडे सिद्धी जौहरच्या तंबूत छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारा अफ़जलखानाचा मुलगा फ़ाजलखान होता. क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला होता हे फ़ाजलखानास माहीती होते. म्हणुन फ़ाजलखान गुप्तहेर शिवाजी काशिद यांना म्हणाला ’क्या आप सचमुच शिवाजी महाराज है ? अगर आपको जान प्यारी है तो सच बत’,यावर शिवाजी काशिद म्हणाले, ’हॉं मै शिवाजी महाराज हू’ आणि फ़ाजलखानाने शिवरायांचा जिरेटोप मागे सारला आणि पाहतो तर काय कपाळावर क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वर्मी बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही.

त्याने तात्काळ ही बाब सिद्धी जौहरच्या नजरेत आणून दिली. सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे.यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी महाराज नाहिस तर कोण आहेस ? यावर शिवाजी काशिद हसत म्हणाले,मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,यावर सिद्धी म्हणाला हं.. कसलं स्वराज्य? कसाला शिवाजी राजा? जौहर संतापलेला होता. शिवाजी काशिद यांना जौहरचे बोलणे आवडले नाही. त्यांचे डोळे रागाने लालेलाल झाले आणि जौहरच्या नजरेला नजर भिडवित शिवाजी काशिद ओरडले…..

खामोश…! 

माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? 

आमचा राजा लाखमोलाचा पोशिंदा आहे.

लाख मरोत पण माझा राजा जगो,असंच मी म्हणणार! 

हे सारं ऐकून सिद्धी जौहर गांगरला. थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला,वैसाही होगा. मरने को हो तैयार..तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ? शिवाजी काशिद हसत म्हणाले, मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घॆतला, त्याच वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण गोंदवून घेतलं. स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो,कसंही येवो. मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही.मेला तरी स्वराज्यासाठी मरण! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही. तेंव्हा मरणाचं भय या गड्याला गालू नकोस समजलं ? जौहर पिसाळला शिवाजी काशिद यांचे बोलने त्याच्या जिव्हारी झोंबलं, छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता, शिवाजी काशिद हे देखील वस्तादों के वस्ताद होते. त्यांना ना मरणाचे भय, ना खेद, ना खंत यांचे बोलणे आणि विचार म्हणजे फ़क्त छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे. शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला.

Narvir shivaji kashid
स्वराज्याचा स्वामींनिष्ठ शिलेदार नरवीर शिवाजी काशिद

“राजे म्हणून जन्माला नाही आला पण शिवाजीराजे म्हणून मरण्याचे भाग्य मिळाले” म्हणून हसत हसत मरणाच्या दारी जाणारे नरवीर शिवाजी काशीद या जिगरबाज आणि स्वामींनीष्ट शिलेदाराचे पराक्रमी बलिदान अखंड स्मरणात राहो. इतिहास शूरवीर शिवा काशिदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापिही विसरु शकणार नाही,कारण शिवाजी काशिद यांच्या सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच आपले शिवराय स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवाजी काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे, शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारली आहेत. पहिल्या म्यूरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडीमार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. तिसऱ्या म्युरल्समध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे. बारा बाय दहा फूट आकारातील हे म्यूरल्स आहेत.

आज १३ जुलै,छत्रपतींच्या या स्वामींनिष्ठ आणि जिगरबाज मावळ्याचा स्मृतिदिन…

राज्यभरातील शिवप्रेमी जनता आणि विशेष करुन नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने गडावर येऊन आपल्या शूरवीराला श्रद्धांजली अर्पण करुन नतमस्तक होत असतात.तसेच नाभिक महामंडळाच्या वतीने देखील नरवीर शिवाजी काशिद यांच्या शौर्य आणि धाडसाचा इतिहास सांगणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.