मोठ्या संख्येने पिक स्पर्धेत सहभागी व्हावे
जिल्हा कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील भात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पिक स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांनी केले आहे. या स्पर्धेत भात, नाचणी या पिकांचा समावेश करण्यात आला असून शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. तसेच, शेतकऱ्याला एकावेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12 उतारा, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ अदिवासी असल्यास) जोडणे आवश्यक आहे. तसेच, पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा व बँक खाते, धनादेश किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट असून या स्पर्धेसाठी वेगवेगळे शुल्क आकरण्यात येणार आहे. तसेच पिक स्पर्धा विजेत्यांना रोख रक्कम बक्षिसाच्या स्वरुपात देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.