विल्होळी सीएनजी पंपावर तांत्रिक बिघाडाने नागरिक हैरान; टेक्निशियनच नाहीत, ग्राहक त्रस्त
नाशिक प्रतिनिधी : ज्ञानेश्वर तुपसुंदर
मो. ८६६८४१३९४६
विल्होळी (नाशिक) – आशियातील सर्वात मोठा असा सांगितला जाणारा विल्होळी येथील सीएनजी पंप सध्या तांत्रिक बिघाडाच्या विळख्यात अडकलेला आहे. मागील पंधरा दिवसांपासून येथे प्रेशर कमी असून, सीएनजी मशीन वारंवार बंद पडत असल्याने वाहनचालक आणि विशेषतः रिक्षाचालकांचे प्रचंड हाल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मशीन सतत बिघडत असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणतेही नियोजन नाही. पंपावर टेक्निशियन, अधिकारी किंवा तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नाहीत, ही सर्वात गंभीर बाब आहे. परिणामी, गॅस भरताना नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे.
सामान्य रिक्षामध्ये चार ते पाच किलो सीएनजी बसते, परंतु प्रेशर कमी असल्यामुळे केवळ दोन ते तीन किलो भरला जातोय. यामुळे रिक्षाचालकांना दिवसातून दोन वेळा पंपावर येऊन पाच ते सहा तास रांगेत उभं राहावं लागत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या रोजीरोटीवर होत आहे.
पंपावर पत्रकारांनी भेट दिल्यानंतर व्यवस्थापनाने ‘तांत्रिक बिघाड’ प्रेशर कमी असल्याचा बोर्ड तातडीने लावला. मात्र ही समस्या नागरिकांनी सातत्याने सहन करत असल्याने ती लपवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवतो.
या गंभीर समस्येची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंप व्यवस्थापनाला जाब विचारला व यावर त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, सीएनजी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही आपली व्यथा पत्रकारांपुढे मांडली. अनेकांनी व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या असून, तरीदेखील व्यवस्थापनाचे दुर्लक्ष सुरूच आहे.
या समस्येवर तातडीने तोडगा न निघाल्यास नागरिकांचा संयम सुटू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएनजी व्यवस्थापनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तांत्रिक तज्ञ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक बनले आहे.
*कोट*
प्रशांत खरात यांचा सीएनजी व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा
“जर ही समस्या तातडीने सोडवली नाही, तर कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. तसेच, आशियातील सर्वात मोठ्या सीएनजी पंपाचा फोंगल कारभार उघडा पाडून ग्राहक मंच आणि संबंधित विभागांना तक्रार केली जाईल.”