शेतकऱ्यांच्या परदेश दौ-याकरीता प्रवासी कंपनी निवडीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शेतकऱ्यांच्या परदेश दौ-याकरीता प्रवासी कंपनी निवडीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230

चंद्रपूर, दि. 15 : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील अद्ययावत शेती तंत्रज्ञान, कृषीमाल प्रक्रिया, निर्यात संधी व बाजारपेठेतील मागणी यांची थेट माहिती करून देण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर शाश्वत व आधुनिक शेती पद्धती अवगत करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलीपाईन्स या देशांमध्ये शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्यात येणार आहेत. या दौऱ्यांमधून शेतकऱ्यांना संबंधित देशांतील कृषी संस्था, प्रक्रिया उद्योग, निर्यात केंद्रे, शेतकरी गट तसेच प्रात्यक्षिक शेतभेटीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात वाढ होऊन त्यांच्या उत्पादन व उत्पन्नात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल.

या अभ्यास दौ-यांचे आयोजन योग्य व नियोजनबद्ध पध्दतीने करण्यासाठी प्रवासी कंपनीची निवड करण्यासाठी GeM (Government e-Marketplace) पोर्टलवर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर निविदा 14 जुलै 2025 रोजी GeM पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. निविदापूर्व बैठक 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजता राजमाता जिजाऊ समिती सभागृह, कृषी आयुक्तालय, दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये इच्छुक प्रवासी कंपन्यांना निविदा प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व स्पष्टता मिळवता येणार आहे. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 25 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे.

सर्व पात्र व अनुभवी प्रवासी कंपन्यांनी GeM पोर्टलवर निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागमार्फत करण्यात येत आहे.