सावित्री नदीला पूर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सावित्री नदीला पूर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पोलादपूरात २४ तासांत १०५ मि.मी. पावसाची नोंद

:सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर, ता. १५ जुलै — पोलादपूर तालुक्यात कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गेल्या २४ तासांत १०५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडत पूरस्थिती निर्माण केली आहे.

रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहत आहेत. सावित्री नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. परिणामी, प्रशासनाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काही गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी तयारी ठेवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांत देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस व महसूल प्रशासन सतर्क असून घटनास्थळी तैनात आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.