भिवंडीत आदिवासी वस्तीचे पाणी बंद करणाऱ्यांवर, पडघा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

भिवंडी:- खांबाळा ग्रामपंचायत क्षेत्रातील कुशिवली कातकरी पाडा येथील आदिवासी कुटुंबीयांनी खासगी व्यक्तीकडून केल्या जाणाऱ्या वाढीव पाणीपट्टी वसुलीस विरोध केल्याने आदिवासी पाड्यातील नागरिकांचा व परिसरातील पाणीपुरवठा बंद केल्याने संबंधितांवर सोमवारी रात्री पडघा पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
खांबाळा ग्रामपंचायत हद्दीतील नळपाणीपुरवठा योजनेसाठी तानसा पाइपलाइनवरून नळजोडणी करण्यात आली आहे. या पाणीवापराची पाणीपट्टी ग्रामपंचायत खात्यातून भरणे अभिप्रेत असताना गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या महिलांकडून मासिक शंभर रुपये प्रत्येक घरातून वसूल करून ती पाणीपट्टी परस्पर मुंबई महापालिकेस भरली जात असे.
भिवंडी तालुक्यातील अंबाडी परिसरात अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी मुंबई महापालिका तानसा पाईपलाईनवरून नळ जोडणी करण्यात आली. परंतु संबंधित ग्रामपंचायत ही पाणीपट्टी वसूल न करता स्थानिक महिला मंडळ दरमहा घरटी ठराविक रक्कम वसूल करून ती परस्पर मुंबई महापालिका पाणी बिलापोटी भरणा करीत असल्याचे सर्रास प्रकार या भागात होत आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात काही खासगी व्यक्ती दरमहा पाणीपट्टी वसुली करून ती स्वतःच्या विनियोगासाठी वापरून मुंबई महापालिकेची पाणीपट्टी थकीत ठेवत असल्याने स्थानिक आदिवासी वस्तीवर पाणी न मिळण्याची वेळ आली. त्यामुळे या कुटुंबीयांना एक डबक्यातून पाणी घेण्याची वेळ आली.
भिवंडी तालुक्यातील खांबाळा ग्रामपंचायत हद्दीतील नळपाणी पुरवठा योजनेसाठी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा पाईपलाईनवरून नळ जोडणी करण्यात आली. या पाणी वापराची पाणीपट्टी ग्रामपंचायत खात्यातून भरणे अभिप्रेत असताना गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या महिलांकडून मासिक शंभर रुपये प्रत्येक घरातून वसूल करून ती पाणीपट्टी परस्पर भरणा केली जात असे.
दरम्यान लॉकडाऊन काळापासून पाणीपट्टी थकीत असल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली असता गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या सदस्य महिलांनी गावातून अतिरिक्त पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. आदिवासी कातकरी कुटुंबीयांच्या प्रत्येक घरातून 500 रुपये अधिक जमा करण्याबाबत तगादा लावला असता मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांनी हे अधिकचे 500 रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे या वस्तीचे पाणी तब्बल तीन दिवस बंद ठेवण्यात आले.
पडघा पोलिसांनी या महिलांविरोधात अनुसूचित जाती व जमातींतर्गत नोंदवला गुन्हा
याबाबत फिर्यादी शुभांगी विश्वास बगले यांनी पडघा पोलिसांकडे धाव घेऊन गावदेवी पाणी कमिटीच्या महिला जयश्री गजानन ठाकरे, जयश्री पाटील, आशा विठ्ठल मांजे, सविता मांजे, चिऊ पाटील यांनी आम्ही दरमहा नियमित मासिक पाणीपट्टी देत असतानाही आदिवासी कातकरी समाजातील असल्याने जाणीवपूर्वक आमच्या परिसरातील पाणीपुरवठा खंडित केल्याबाबत तक्रार दिली असता पडघा पोलिसांनी या महिलांविरोधात अनुसूचित जाती व जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 नुसार 3(1) नुसार गुन्हा दाखल केला.