ॲड.प्रवीण मधुकर ठाकूर यांची सैनिक कल्याण निधीस लाखाची मदत

ॲड.प्रवीण मधुकर ठाकूर यांची सैनिक कल्याण निधीस लाखाची मदत

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील नामांकित वकील व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड.प्रवीण मधुकर ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सैनिक कल्याण निधीस १ लाख रुपयांची मदत केली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. गेली १९ वर्षे ॲड. ठाकूर आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सैनिक कल्याण निधीस लाखांची मदत करीत असून सोमवारी (२१ जुलै) रोजी त्यांनी जिल्हा सैनिक अधिकारी कार्यालयातील सब लेफ्टनंट (निवृत्त) विजय पाटील यांच्याकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्त केला. ॲड.प्रवीण ठाकूर यांनी यावेळी सांगितले की, “आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे.”
सुभेदार (ले )(निवृत्त) विजय पाटील यांनी ॲड. प्रविण ठाकूर यांचे आभार मानताना सांगितले, “अशा प्रकारच्या मदतीमुळे शहीद व सेवापर सैनिकांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो. समाजातील इतरांनीही प्रेरणा घ्यावी.”
शहरातील विविध संघटनांनी, मित्रमंडळींनी व नातेवाईकांनी त्यांच्या या सामाजिक कार्याचे स्वागत केले आहे. ॲड. ठाकूर यांच्या या उपक्रमामुळे सैनिक कल्याण निधीस आर्थिकदृष्ट्या बळ मिळणार असून, इतर नागरिकांमध्येही समाजसेवेविषयी जागरूकता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ठाकूर यांच्या कन्या अपूर्वा ठाकूर, धनश्री ठाकूर, कुबेर ठाकूर, आर.डी. पाटील, सुभेदार अभिजित शिंदे, नायक बळीराम म्हात्रे,तबिश खान व संजय सावंत इ. उपस्थित होते.