दीड लाख ग्राहकांवर होणार महावितरण कंपनीकडून कारवाई
जिल्ह्यात 48 कोटींची थकबाकी
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- महावितरण कंपनीची वीज बिले वेळेवर भरली जात नाहीत. त्यामुळे वीज बिलाचा बोजा कायमच बसतो. घरबसल्या विज बिल भरण्याची सोय असताना देखील नियमीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांमुळे महावितरण कंपनीच्या वीज सेवेवर परिणाम होत आहे. थकीत वीज बिलामुळे महावितरण कंपनीला मोठा आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील एक लाख 58 हजार 63 ग्राहकांनी 47 कोटी 99 लाख रुपयांचे वीज बिल थकविल्याची माहिती महावितरण कंपनीकडून उपलब्ध झाली आहे. या थकबाकीच्या यादीत जिल्हयातील एक हजार 124 कारखान्यांचा समावेश आहे.
पेण येथे महावितरण कंपनीचे जिल्ह्याचे कार्यालय आहे. या कार्यालयाअंतर्गत चार विभाग, 17 उपविभाग, 104 सेक्शन आहेत. एक हजार 200 कर्मचाऱ्यांमार्फत सुमारे सहा लाख 58 हजार ग्राहकांना वीज पुरवठा देण्याचे काम महावितरण कंपनी करीत आहेत. अपुरी यंत्रणा असून, देखील ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न महावितरण कंपनी करण्याचा प्रयत्न करीत आहे. दर महिन्याला वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घरोघरी जाऊन वीज बिल वापराची माहिती घेतात. ती माहिती महावितरण कंपनीकडे पाठवितात. त्यानुसार ग्राहकांना वीज बिल दिले जाते. साधारणतः मोबाईलवर मेसेज तसेच कागदी वीज बील घरपोच देखील दिले जात आहे.
पुर्वी वीज बील भरण्यासाठी ग्राहकांनामहावितरण कंपनीच्या कार्यालयावर अवलंबून राहवे लागत होते. त्यामुळे प्रचंड गर्दी या कार्यालयासमोर होत असत. ही गर्दी कमी करण्यासाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयांसह काही बँका, पतसंस्थांमध्ये वीज बील भरण्याची व्यवस्था करण्यात आली. ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे या केंद्रामध्यदेखील वीज बिल भरण्यास रांगा लागतात. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महावितरण कंपनीने ऑनलाईनचा आधार घेतला. गुगल पे, फोन पे व अन्य ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या वीज बिल भरण्याची सोय करण्यात आली. परंतू, काही ग्राहकांकडून विज बिल भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महावितरण कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. कोट्यावधी रुपयांचे वीज बिल थकल्याने ते वसूल करताना कंपनीला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वीज बिल भरण्यासाठी आधुनिक पध्दत सुरु केली असतानाही वीज बिल थकीतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वीज बिल थकीतदारांमुळे वीज सेवेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. वेळेवर विज बिल न भरल्याने विद्यूत कनेक्शन तोडण्याची वेळ महावितरण कंपनीवर आली आहे. अनेकवेळा ग्राहकांच्या घरी जाऊन वीज बील भरण्याचे आवाहनही केले जात आहे. काही वेळा विज बील भरण्यावरून कर्मचारी आणि ग्राहक यांच्यामध्ये वादही होतात.
रायगड जिल्हयातील एक लाख 58 हजार 63 ग्राहकांनी वीज बील थकविले आहे. 47 कोटी 99 लाख 11 हजार रुपयांची थकीत रक्कम आहे. ही रक्कम वसूल करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. या थकीतमध्ये रायगड जिल्ह्यातील 15 हजार 649 व्यावसायिक आणि एक हजार 124 कारखान्यांचा ही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
विज बिल नियमीत वेळेत भरले जात नाही. त्याचा परिणाम सेवेवर होत आहे. ग्राहकांनी तातडीने विद्यूत बिल भरावे. थकीत बिल ग्राहकांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली असून नागरिकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे.
धनराज बक्कड
अधीक्षक अभियंता, पेण रायगड
थकीत बिलावर दृष्टीक्षेप
कनेक्शन ग्राहक थकीत रक्कम (रुपये)
घरगुती 1 लाख, 41 हजार, 290 25 कोटी, 71 लाख,48 हजार
व्यावसायिक 15 हजार, 649 नऊ कोटी, 53 लाख, 68 हजार
कारखाने एक हजार, 124 12 कोटी, 73 लाख, 95 हजार
एकूण एक लाख 58 हजार 63 47 कोटी,99 लाख, 11 हजार