श्रीपाद छिंदम याला न्यायालयीन कोठडी

49

नगर-छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी झालेला भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. जिल्ह्यात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज सकाळी श्रीपाद छिंदमला न्यायालयात हजर केलं. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

छिंदमच्या बेताल वक्तव्याने शहरभर तणाव निर्माण झाला होता. त्याच्याविरोधात शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पथके पाठवली होती. नगर-सोलापूर रोडवर शिराढोण शिवारात अंधारात छिंदम लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक करून तोफखाना पोलिस स्टेशनला आणले. त्याला आज सकाळी न्यायालयात हजर केलं. त्याला १ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी सकाळी छिंदमने मनपा बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. खड्डे बुजविण्याच्या कामासाठी काल माणसे का पाठविली नाहीत, याची विचारणा केली होती. शिवजयंती झाल्यानंतर माणसे पाठवितो, असे बिडवे म्हणाले होते. त्यानंतर शिवाजी महाराज व शिवजय़ंतीबाबत छिंदम यांनी अपशब्द वापरले. याबाबत बिडवे यांनी महापालिका कर्मचारी युनियनकडे तक्रार केली होती. त्यानंतर या संभाषणाची क्लिपही व्हायरल झाली होती. त्यामुळे नगरमध्ये तणाव निर्माण होऊन छिंदम यांच्या संपर्क कार्यालयाची, घराची तोडफोड झाली. छिंदमने केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख सातपुते यांनी तोफखाना पोलिस स्टेशनला धार्मिक भावना दुखविल्याची फिर्याद दिल्याने त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी छिंदमचा शोध सुरू केला. त्याचा मोबाइल बंद असल्याने त्याचे लोकेशन मिळत नव्हते. एका कार्यकर्त्याच्या कारमधून छिंदम पळाल्याचे समजल्यावर त्या कार्यकर्त्याचा नंबर मिळवून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. नगर-सोलापूर रोडवर शिराढोण येथे छिंदम लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने शिराढोण येथून छिंदमला अटक केली. छिंदम ज्या कारमधून पळून गेला होता, त्या कारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी वाहनांमधून पाठलाग केला होता. शिराढोण येथे वाहन पाठलाग करीत असतानाच मध्येच गाडी थांबवून छिंदम या गाडीतून उतरला. छिंदमचा वाहनचालक गाडी घेऊन पुढे निघून गेल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या गाडीचा पाठलाग करीत होते, तर छिंदम शिराढोण येथे लपून बसला होता, असे स्वतः छिंदम यानेच पोलिसांना सांगितल्याची माहिती पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली.