रायगड जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू असून कृषी सेवा केंद्रांमध्ये झालेल्या नियमभंगांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
खत नियंत्रण आदेश 1985 नुसार रासायनिक खतांचा साठा अद्यावत ठेवणे, खताची विक्री कमाल दरापेक्षा जास्त किमतीत न करणे, शेतकऱ्यांना एम फॉर्म मध्ये बिले देणे तसेच विक्री बिलामध्ये सर्व आवश्यक तपशीलांचा समावेश करणे, व अनुदानित खताची विक्री पॉस मशीनद्वारेच करणे या अटी बंधनकारक आहेत. मात्र, तपासणीत दीपा कृषी सेवा केंद्र (पनवेल) व भूषण कृषी सेवा केंद्र (पोयनाड) येथे या अटींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
तपासणीत साठा रजिस्टरमधील शिल्लक खत साठा, पॉस मशीनमधील खत साठा व प्रत्यक्ष साठ्यामध्ये फरक आढळला. तसेच शेतकऱ्यांना योग्य पावत्या न देणे व कमाल विक्री दरापेक्षा जास्त दराने खत विक्री केल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दोन्ही कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. पुढील काळात जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रांची तपासणी अधिक काटेकोरपणे करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.