अवजड वाहतूक बंदी फक्त कागदावरच

अवजड वाहतूक बंदी फक्त कागदावरच

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील आठ पूल धोकादायक असल्याने जिल्हाधिकारी यांनी या पुलांवरून अवजड वाहनांना तात्काळ बंदीचे आदेश जारी केले होते. आठ दिवसांपूर्वी हे आदेश काढले होते. परंतु, अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर व रामराज पुलावरून मोठ मोठे खासगी ट्रक, डंपरची खुलेआमपणे वाहतूक होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांची अवजड वाहतूक बंदी फक्त कागदावरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुलावर अवजड वाहतूक बंदीचा फलक लावण्यासही सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन ठरले आहेत.

विजना कन्स्लटींग इंजिनिअरींग प्रा. लि. या संस्थेमार्फत अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे व भाकरवड-देहेन या मार्गांवरील एकूण 8 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. त्यामध्ये अलिबाग-रोहा मार्गावरील रामराज पूल, नवघर पूल, सुडकोली पूल, स्लॅब कलवर्ट, (पाण्याच्या अडथळ्यावर ठेवलाल सपाट आणि काँक्रीटचा बनवलेला भाग), अलिबाग-रेवदंडा मार्गावरील सहाण-पूल, नवेदर बेली पूल, भाकरवड – देहन रस्त्यावरील देहेन पूल या पुलांचा समावेश आहे. या पुलांची व स्लॅब कलवर्टची रस्त्यावरील भार क्षमता पाच ते 16 टन असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील पूल व स्लॅब कलवर्ट संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या आठ धोकादायक पुलांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालणारा आदेश जारी केला. पावसाळ्यामुळे पूल अधिक असुरक्षित झाल्याने वाहनचालकांनी व ट्रान्सपोर्ट संस्थांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे. अपघात टाळण्यासाठी व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात आली असल्याचे लेखी आदेश काढण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत बंदी लागू राहणार असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले होते. मात्र अलिबाग रोहा मार्गावरील नवघर, रामराज, सुडकोली येथील धोकादायक पुलांवरून काही खासगी ट्रक, डंपरसारखी अवजड वाहने पहाटेच्या वेळी खुलेआमपणे जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली काही खासगी अवजड वाहन चालकांकडून होत आहे. याकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे अवजड वाहतूक बंदीचे फक्त कागदावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून होत असलेल्या खासगी अवजड वाहनांना रोखणार कधी, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.

अवजड वाहतूक बंदीचा फलकच नाही
रामराज व नवघर येथील पूल धोकादायक असल्याने नागरी सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी यांनी अलिबाग-रोहा मार्गावरील रामराज,सुडकोली व नवघर पुलावरून अवजड वाहतूकीला बंदी घातली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने अवजड वाहतूकीला बंदीचे फलक पुलापासून काही अंतरावरून लावणे गरजेचे होते. परंतु ते फलक न लावता वाहने सावकाश चालवा, असे सुचना फलक लावले आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.