15 ऑगस्टला साखर सुतारवाडीतील ग्रामस्थ आत्मदहनाचा इशारा — ‘आपली माती आपली माणसं’ संघटनेचा इशारा सरकारला खडबडून जागवणार!
सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर :- पोलादपूर 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महाप्रलयात संपूर्ण कोकण हादरले होते. महाड तालुक्यातील तळीये, तसेच पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी, केवनाळे या गावांमध्ये डोंगरकड्यांचे मोठ्या प्रमाणात दरड कोसळून अनेकांचे जीव गेले, घरं उद्ध्वस्त झाली आणि गावं नष्ट झाली.
त्याच दुर्घटनेला आज चार वर्षं पूर्ण झाली, पण साखर सुतारवाडी आणि केवनाळेतील पीडित नागरिक अजूनही पक्क्या घरांपासून वंचित आहेत. सरकारने तळीये गावाला नव्याने घरे बांधून दिली, परंतु साखर सुतारवाडीतील 44 घरांचे पुनर्वसन अजूनही अधांतरी आहे.
शाळा, अंगणवाडी, डांबरी रस्ते पण घर नाही?
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, सरकारने त्यांच्या मूळ वसाहतीत शाळा, अंगणवाडी आणि डांबरी रस्ते बांधले, पण घरचं नाही तर या नागरी सुविधा कशासाठी? अजूनही अनेक कुटुंबं कापडे व पोलादपूर परिसरात भाड्याने राहतात.
आश्वासनं अनेक, कृती नाही
शासनाचे अनेक दौरे झाले, प्रस्ताव मंजूर झाले, निधी जाहीर झाला – पण अजूनही त्यातून योग्य ती घरे उभी राहिलेली नाहीत. मंजूर निधी अपुरा आहे, त्या पैशात परिपूर्ण घरे उभी करणे शक्य नाही, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा
या अन्यायकारक परिस्थितीला कंटाळून ग्रामस्थांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी शासनाने बांधून दिलेल्या इमारतीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या व्यथा आणि मागण्या ‘आपली माती आपली माणसं’ संस्थेच्या माध्यमातून सरकारपुढे मांडण्यात आल्या आहेत.
संस्थापक श्री. राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, ग्रामीण कमिटीचेअध्यक्ष श्री.हरिभाऊ पवार व पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
शंभर टक्के न्याय मिळवून देणार”
आपली माती आपली माणसं संस्थेच्या वतीने ग्रामस्थांना शंभर टक्के न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, शासनाला खडबडून जाग येईल असा तीव्र इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या या आत्मदहनाचा सरकारला जबाबदार धरले जाईल, अशी स्पष्ट भूमिका सुतारवाडी ग्रामस्थ आणि संस्था यांनी घेतली आहे.