पाककला व रांगोळी स्पर्धा महाड येथे उत्साहात संपन्न – अलिबाग शिक्षक पतपेढीचा उपक्रम प्रेरणादायी : आमदार प्रवीण दरेकर

पाककला व रांगोळी स्पर्धा महाड येथे उत्साहात संपन्न –
अलिबाग शिक्षक पतपेढीचा उपक्रम प्रेरणादायी : आमदार प्रवीण दरेकर

सिद्धेश पवार,
प्रतिनिधी पो़लादपूर तालुका
8482851532

रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड, अलिबाग यांच्या वतीने शिक्षकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय हॉलमध्ये पाककला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलिबाग शिक्षक पतपेढीचे चेअरमन तसेच शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा विधान परिषदेचे गटनेते व मुंबई बँकेचे चेअरमन आमदार प्रवीण दरेकर, भाजपा राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी बिपिन म्हामुणकर, भाजप महाड तालुका अध्यक्ष निलेश तळवटकर, माजी उपनगराध्यक्ष संदीप ठोंबरे, महाड गटशिक्षणाधिकारी राजन सुर्वे यांच्यासह विविध मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चेअरमन राजेश सुर्वे यांनी पतपेढीच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. “सन 1925 मध्ये संस्थेची स्थापना झाली असून, यंदा संस्थेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. शिक्षकांच्या कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी पाककला व रांगोळी स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ आहे,” असे ते म्हणाले. स्पर्धेद्वारे शिक्षकांच्या कल्पकतेला चालना मिळते आणि ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी बोलताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, “शिक्षक हा केवळ अध्यापन करत नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देतो. त्यामुळे कला शिक्षकांच्या स्वभावातच असते. अशा स्पर्धांद्वारे शिक्षकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हे प्रशंसनीय आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “राज्यातील शिक्षकांच्या समस्या विधान परिषदेच्या माध्यमातून मांडल्या जातील, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकांच्या प्रश्नांवर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.” त्यांनी अलिबाग पतपेढीच्या कार्याचे कौतुक करताना भविष्यातही आवश्यक तेव्हा संस्थेला मदत करण्याची ग्वाही दिली.

यावेळी चेअरमन राजेश सुर्वे यांनी महाड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची आवश्यकता व्यक्त केली. “महाडमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे महाडमध्ये एक सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात यावी,” अशी विनंती त्यांनी आमदार दरेकर यांच्याकडे केली.

कार्यक्रमात स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका सौ. रेश्मा धुमाळ, संचालक निलेश साळवी, रवींद्र पालकर, बालाजी गुबणरे, प्रफुल्ल पवार (महाड), शिक्षक परिषद कोकण विभागाचे श्री. सुजित बनगर, तालुका अध्यक्ष सचिन खोपडे, कार्यवाह प्रशांत माने, कोषाध्यक्ष रवींद्र पाटील, संजय कोंडविलकर, रमेश देठे, बाळासाहेब बारगजे, समीर होडबे, मनीषा पवनारकर, पूजा शहा, उषा खोपडे, सोष्टे मॅडम आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन उषा खोपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रसिद्धी प्रमुख वैभव कांबळे यांनी केले.