कुर्डूस गावातील विहिरीवरच्या दहीहंडीची परंपरा
33 वर्षात एकाही गोविंदाला इजा नाही
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- गोकुळाष्टमी म्हणजे मानवी मनोरे, हंडी, थरार आणि जल्लोष! पण, अलिबाग मधील कुर्डूस गावात हा जल्लोष अक्षरशः विहिरीवर रंगतो. 1992 पासून सुरू झालेली ही अनोखी परंपरा आज 33 व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि विशेष म्हणजे या थरारात आजवर एकाही गोविंदाला इजा झालेली नाही.
देऊळआळी परिसरातील पिंगळे, पाटील, शेरमकर, थळे आणि केणी या कुटुंबातील धाडसी तरुणांनी 1992 साली ही वेगळी दहीहंडी सुरू केली. सुरुवातीला सीताफळीच्या झाडाच्या आधाराने प्रयत्न, नंतर विहिरीच्या कठड्यावर थर, आणि शेवटी हंडीकडे झेप! गोविंदाने हात लावताच हंडी ‘फुटली’ मानली जाते, नंतर ती खाली उतरवून विहिरीत फोडली जाते. त्यानंतर सर्व गोविंदांची विहिरीत उडी आणि जल्लोषाचा महापूर असा असतो.
मुंबई, पुणे आणि राज्यभरातून पथके येथे धाव घेतात. गेल्या वर्षी आकाश पिंगळेने सलग पाचव्यांदा हंडी फोडून विक्रम केला. दुपारी 12 वाजता पूजा व पालखी सोहळ्यानंतर या थराराला सुरुवात होत असल्याची माहिती आयोजक पराग पिंगळे यांनी दिली. कुर्डूसची विहिरीवरील दहीहंडी ही आता फक्त खेळ किंवा स्पर्धा नसून धाडस, परंपरा आणि एकतेचा उत्सव बनली आहे.