पनवेल पासुन नेरे पर्यंतच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था
गणेशोत्सवापुर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो. 7715918136
पनवेल : – पनवेल मधील आकर्ली पासुन ते नेरे पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पादचाऱ्यांना व वाहनांना रस्त्यावरुन चालणे देखील अवघड झाले आहे. गणेशोत्सव आठवडाभर जवळ आला असून सुध्दा यंदा बाप्पाचे आगमन खड्ड्यामधुन होणार काय, असा प्रश्न पनवेलमधील नागरिक विचारत आहेत. त्यानुसार सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्याचा गंभीर इशारा छावा सामाजिक संस्था व सम्यक विचार मंच ह्या संघटनांनी दिला आहे.
नविन पनवेल येथील आकुर्ली पासुन नेरे गावाकडे जाणा-या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून पादचाऱ्यांना व वाहनचालकांना खड्ड्यामध्ये रस्ता शोधावा लागत आहे. पनवेलहुन नेरे गावाकडे जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने येथे सतत रहदारी सुरू असते. ह्या मुख्य रस्त्यातील आकुर्ली, चिपळे, कोप्रोली , नेरे पाडा येथिल रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पनवेल माथेरान मार्गावर शहरी भागात काही ठिकाणी सिमेंट काॅंक्रिटीकरण झाले असले तरी शहरी भाग सोडल्यानंतर आकुर्ली पासुन नेरे पर्यंत मुख्य रस्त्यावर मात्र बहुतांश ठिकाणी डांबरीकरण आहे. त्यामुळे ह्या मार्गावर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात. नविन पनवेल मधुन शिवा काॅम्प्लेक्स येथुन पुढे आदई सर्कल पासुन आकर्ली पर्यंत रस्त्यावरील वीजेचे पथदिवे कायम बंद असतात. आकुर्ली पासुन नेरे पर्यंतच्या रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना काळोखातुन मार्ग शोधावा लागत आहे. पथदिव्यातील विद्युत पुरवठा बंद असल्याने रात्रीच्या वेळेस दुचाकीस्वार आणि वाहनचालकांचे ह्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत.
चिपळे येथिल नदीवर नुकतेच नवीन पुलाचे उद्घाटन झाले आहे. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंच्या समोर दुभाजकाच्या जागेवर खड्डे पडलेले आहेत. सदर नवीन पुलाचे बांधकाम चुकीचे केले असल्यामुळे दुभाजकाच्या खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार व वाहनचालकांचे नेहमी अपघात होत आहेत. ह्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तसेच प्रवासी व चालक वर्गात संतापाची लाट पसरलेली आहे. त्याच अनुषंगाने गणेशोत्सवापूर्वी सदर मार्गावरील खड्डे न बुजविल्यास आणि बंद असलेले पथदिवे सुरू न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या विरुध्द आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्याचा गंभीर इशारा छावा सामाजिक संस्था आणि सम्यक विचार मंच ह्या संघटनेचे पदाधिकारी श्री. प्रविण केणी व प्रसाद कांबळे यांनी दिला आहे.