क्रिकेट पंच घडविण्यासाठी रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक पाऊल

क्रिकेट पंच घडविण्यासाठी रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक पाऊल

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए) तर्फे शनिवार, २३ ऑगस्ट रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील स्टेडियम हॉल येथे जिल्हास्तरीय क्रिकेट पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत जिल्ह्यातील तब्बल ३० पंच सहभागी झाले होते.
गेल्या ७५ दिवसांपासून ऑनलाईन व प्रत्यक्ष कार्यशाळांच्या माध्यमातून पंचांना मार्गदर्शन करण्यात आले होते. माजी रणजी ट्रॉफी खेळाडू व विद्यमान बीसीसीआय पंच हर्षद रावले, एमसीएचे पंच राजन कसबे तसेच आरडीसीएचे मार्गदर्शक व क्रिकेट नियम तज्ञ नयन कट्टा यांनी पंचांना प्रशिक्षण दिले.
परीक्षेपूर्वी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी उपस्थित पंचांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, गतवर्षी असोसिएशनच्या वतीने मुला-मुलींच्या सर्व वयोगटातील तब्बल ३२५ सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सर्व सामन्यांसाठी रायगड जिल्ह्यातील होतकरू पंचांनी उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
रायगड जिल्ह्यात दर्जेदार पंच व गुणलेखक तयार करण्यासाठी असोसिएशनकडून सातत्याने प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षी एमसीएच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सोळा वर्षाखालील मुलांचे १५ सामने रायगडमध्ये घेण्यात आले होते. आगामी काळात आणखी जास्तीत जास्त सामने रायगडमध्ये मिळविण्याचा प्रयत्न राहील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पंच परीक्षेत लेखी, प्रात्यक्षिक व तोंडी अशा तिन्ही प्रकारांचा समावेश होता. परीक्षक म्हणून बीसीसीआय पंच हर्षद रावले, एमसीए पंच राजन कसबे, क्रिकेट नियम तज्ञ नयन कट्टा, ॲड. पंकज पंडित, विघ्नहर्ता मुंढे, सागर मुळे, रोहन पाटील, वरून म्हात्रे व प्रशांत माळी यांनी योगदान दिले.