बाप्पा, तुला कुठे ठेवू रे!; आजी जनाबाईंची गणेशाकडे आर्त हाक

बाप्पा, तुला कुठे ठेवू रे!; आजी जनाबाईंची गणेशाकडे आर्त हाक

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- आमचं संगळं वाटोळं होऊन गेलंय. घरातील सामान, कपडालत्ता, सगळं-सगळं गेलंय. आमचं काहीच राहिलं नाही. मेल्यात गिणती आहे आमची. संसार उघड्यावर पडला असून, आम्ही रस्त्यावर हाय बघा. गळ्यात अपंग मुलगा, गोठा पाडल्याने ऐन पावसात निवारा हरवलेली गुरे.. सगळंच एका झटक्यात संपवून टाकलंय या शासनकर्त्यांनी, असा सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील संताप, चीड अन् खोलवर गेलेल्या डोळ्यातून वाहात असणारे जनाबाई आजींचे अश्रू मनातील यातना सांगून गेले. डोक्यावरील छत हरवल्याने वर्षानं पाहुणा येणाऱ्या बाप्पाला ठेवायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
उसर येथील मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी जमीन दिली गेली आहे. अशावेळी, त्या ठिकाणी एका जनाबाई माऊलीच्या घराचा थोडा भाग मेडिकल कॉलेजच्या जागेत निघाले. ही जागा ग्रामपंचायतीकडून 2-4 वर्षांपूर्वी खरेदी केली गेली. जवळजवळ 50 वर्षांपूर्वी हे घर बांधले होते. आणि गुरांचा गोठा 65 वर्षांपूर्वी बांधला होता. पण, आज मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी त्या माऊलीचे ज्या घरात माऊलीचा अपंग मुलगाही आहे, ते घर आणि गुरांचा गोठा जमीनदोस्त करण्यात आला.
ज्या मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सेवेचे संस्कार दिले जातील. त्याच मेडिकल कॉलेजचा पाया रचताना एका माऊलीचा आक्रोश त्या पायामध्ये पुरला गेला. तिच्या डोळ्यासमोर पै पै साठवून बांधलेले घर पडले. तिच्या आयुष्याची पायरी-पायरी विटांनी रचलेली स्वप्नं धुळीस मिळाली. या वयात त्या माऊलीला झालेल दुःख कोणाला तळतळाट देऊन जाणार?
ती माऊली आणि तिचा मुलगा फक्त काही दिवस वेळ मागत होते. ऐन गणपतीच्या सणाच्या तोंडावर शासनाची अवकृपा माऊलीला भोगावी लागली. गणपती होईपर्यंत किंवा पाऊस जाईपर्यंत तरी ते घर पाडणे रोखू शकले असते ना. आज दोन अडीच हजार पेंड्या पावसात भिजून खराब होत आहेत. आणि गुरेही उघड्यावर पावसात भिजत आहेत. पण, जिथे मनं मेलेली असतील, तिथे भावनांची अपेक्षा करणंच चुकीचं आहे. आज पोलीस बंदोबस्तामध्ये एका माऊलीचे घरकुल आणि गुरांचा गोठा पाडताना माऊलीचा आक्रोश काळीज पिळवटणारा होता. त्या आक्रोशाला न्याय मिळणे सध्याच्या काळात कठीणच आहे.