काल ग्रामसभेत विषय गाजला, आज रस्ता सजला – अर्नाळा ग्रामसभेला ऐतिहासिक वळण
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
अर्नाळा :- गणपती बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अर्नाळा गावातील खडेमय मुख्य रस्त्यांबाबत अनेकदा प्रशासनाला तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, अखेर लाल बावटा पक्षाच्या पुढाकारामुळे काल भरविण्यात आलेल्या ऐतिहासिक ग्रामसभेत या मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठविण्यात आला आणि त्यानंतर केवळ २४ तासांतच रस्तादुरुस्तीची कामे प्रचंड वेगाने सुरू झाली.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या ग्रामसभेत अर्नाळा गाव प्रमुख काॅम्रेड भारती जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले. अनेक प्रयत्न करूनही सभा तहकूब व्हावी यासाठी काहींच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, लाल बावटा पक्षाच्या जिद्दीपुढे त्या निष्फळ ठरल्या. ग्रामसभेत प्रथमच शंभराहून अधिक ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने 100 चा कायदेशीर काॅरम पूर्ण झाला. हा क्षण ग्रामसभेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच श्री. नंदुरबार घरत, ग्रामपंचायत अधिकारी श्री. नितीन राणे व मान्यवर सदस्यांनी ग्रामस्थांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करून ग्रामसभा यशस्वी झाल्याचे घोषित केले.
या सभेत रस्ता, पाणी, नादुरुस्त सौचालये, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, रोड लाईट, मागासवर्गीयांसाठीचा १५ टक्के निधी, आदिवासी समाजातील घरकुल योजना, घरपट्टी आकारणीद्वारे ग्रामपंचायतीचे उत्पन्नवाढ आदी महत्त्वाचे विषय चर्चेत आले. ग्रामस्थांनी आपले प्रश्न ठामपणे मांडत प्रशासनाला जागे केले.
या ऐतिहासिक ग्रामसभेत मांडलेल्या मुद्द्यांचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला. आज सकाळपासूनच गावातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यानिमित्ताने लाल बावटा पक्षाचे जिल्हा सहसचिव काॅम्रेड शेरू वाघ यांनी सरपंच व ग्रामसेवकांचे आभार मानले असून, ग्रामसभेच्या सामूहिक ताकदीमुळे गावातील प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला.