सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909 

सिंदेवाही :- विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे व त्यांच्या सर्वांगीण आरोग्यवृद्धीसाठी पूर्ण शरीर आरोग्य तपासणी शिबिर सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही व प्राथमिक आरोग्य केंद्र, वासेरा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. हे शिबिर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी कल्याण समिती यांच्या सहकार्याने पार पडले.

हा उपक्रम प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांनी तरुण विद्यार्थ्यांसाठी नियमित आरोग्य तपासण्या किती आवश्यक आहेत, यावर भर देत असे उपक्रम केवळ वेळेवर वैद्यकीय सहाय्यच देत नाहीत तर विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासही प्रेरित करतात, असे मत व्यक्त केले. तसेच शिबिर यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक, डॉक्टर आणि स्वयंसेवकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.

या शिबिराचे समन्वयक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रिजवान शेख व प्रा. अमित उके, तसेच विद्यार्थी कल्याण समितीचे प्रमुख प्रा. अशोक भोसले यांनी कार्यभार सांभाळून विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या व शिबिर यशस्वी पार पाडले.

शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व हिमोग्लोबिन (Hb), कंप्लीट ब्लड काउंट (CBC), कार्डियाक फंक्शन टेस्ट (CFT), किडनी फंक्शन टेस्ट (KFT), सोल्युबिलिटी टेस्ट, थायरॉईड फंक्शन टेस्ट (TFT), लिपिड प्रोफाईल, एच.बी.ए1सी (मधुमेह तपासणी) अशा विविध तपासण्या करून घेतल्या. या सर्व तपासण्यांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्यस्थितीबाबत संपूर्ण व अचूक माहिती मिळाली.

तज्ज्ञ पथकाने विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिनचे महत्त्व, रक्तअल्पता होण्याची कारणे व प्रतिबंध, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता व अन्य जीवनशैलीशी संबंधित आजार याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप व आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारल्यास अनेक आजारांवर मात करता येते, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्राथमिक आरोग्य केंद्र, वासेरा येथील टीमने मोलाचे योगदान दिले. या पथकात श्रीमती कुंदा शेडमाके, अनिल इरबटुरवार, कु. शरयू भागवत, सुषमा सेमास्कर, माधुरी बोधाने, रुपाली पेंडाम, अमीषा नवगडे व सुनील कांबळी यांनी सहभागी होऊन मनापासून सेवा व वैद्यकीय सहाय्य केले.

विद्यार्थ्यांनी या शिबिरातून समाधान व्यक्त करताना सांगितले की, अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे केवळ वैद्यकीय तपासण्या होत नाहीत तर जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याची प्रेरणा मिळते.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विनय त्रिपाडे, प्रा. जयंत रामटेके, डॉ. रमेश राठोड व प्रा. तुकाराम बोरकर यांनी विशेष मेहनत घेतली.