सुहाना खानच्या जमिन खरेदी प्रकरणात शर्तभंग
प्रशासनाची धावपळ
अलिबाग(रत्नाकर पाटील)
अलिबाग :- बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने आपल्या जवान चित्रपटाने भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणारी व्यक्तिरेखा साकारली होती. पण म्हणतात ना चित्रपटात असते ते ते सारे सत्य नसते असेच काहीसे चित्र अलिबाग तालुक्यात थळ येथे पाहावयास मिळाले. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने खरेदी केलेल्या जमिनीमध्ये शासनाची जागा लाटल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. म्हणजेच शासकीय जमिनी बळकावण्याचा भ्रष्टाचार केल्याचे तक्रार अर्ज शासन दरबारी दाखल झाले आहेत. दैनिक मिडिया वार्ता न्यूज च्या वृत्ताने जिल्हा प्रशासन खडबडून जागे होत प्रशासनने संबंधित जागेचा वास्तवदर्शी अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार अलिबाग यांना दिले. तहसीलदारांनी आदेशानुसार स्थळपाहणी करून अहवाल सादर केला असून या अहवालात शर्तभंग झाल्याचे दिसून येत असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनानाला सादर केला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामुळे सुहाना शाहरुख खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी सचित्र वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार अलिबाग यांना दिले आहेत. यामुळे चित्रपटात भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारा जवान अर्थात शाहरुख खान आपल्या कन्येला वाचविण्यासाठी कोणती शक्कल लढवणार, याकडे लक्ष लागले आहे. या जागेसंदर्भात थळ ग्रामपंचायत, ॲड. विवेकानंद ठाकूर आणि थळ ग्रामस्थांच्या सहा अशा एकूण आठ तक्रारी जिल्हा प्रशासनाच्या दरबारी दाखल झाल्या आहेत. दाखल झालेल्या तक्रारीनुसार, जिल्हा प्रशासनच्या महसूल विभागाने अलिबाग तहसीलदार यांच्या कोर्टात या तक्रारींचा चेंडू टाकला. अलिबाग तहसीलदार यांनी आपल्या यंत्रणेला सतर्क करीत सुहाना खान यांनी खरेदी केलेल्या जमीनच सर्वे केला. स्थळपाहणी करून तेथे पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यात सर्वे करणाऱ्या यंत्रणेने केलेल्या तक्रारी योग्य असून शर्तभंग झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करून तसा अहवाल तहसीलदार अलिबाग यांना सादर केला. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार तहसीलदार यांनी जिल्हा प्रशासनाला शर्तभंग झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे कळवले आहे. यामुळे सुहाना खान यांचे धाबे दणाणले आहेत.
सुहाना खान यांनी जागा खरेदी करण्यापूर्वी ती जागा खोटे यांच्याकडे होती. त्यांनी 2022 मध्ये सदरची जागा वर्ग 1 मधून वर्ग 2 करण्यासाठीचा महसूल शाखेकडे प्रस्ताव सादर केला. परंतु या जागेसंदर्भात तक्रारी दाखल झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या महसूल शाखेने याबाबत अलिबाग तहसीलदार यांच्याकडे प्रकरण पाठवले. अलिबाग तहसीलदार यांच्याकडून येणाऱ्या अंतिम अहवालाची महसूल शाखा प्रतीक्षा करीत आहे. अद्याप या जागेबाबतचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. यामुळे सुहाना खान यांनी खरेदी केलेली जागा वर्ग 1 ची वर्ग 2 अद्याप झालेली नाही. असे असताना शासनाचे नियम धाब्यावर बसवून त्या जागेत जिल्हाधिकारी रायगड यांची कोणतीही परवानगी न घेता बिनबोभाट टोलेजंग इमला उभारण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काहीअंशी नियमबाह्य बांधकाम या जागेत करण्यात आले आहे. यामुळे सुहाना खान यांनी शर्तभंग केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले.
अलिबाग तालुक्यातील थळ येथे सर्वे क्रमांक 345/2 या जागेत शर्तभंग झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्याच जमिनीसाठी वर्ग 1 मधून वर्ग 2 करण्यासाठीचा अर्ज देखील प्राप्त झाला आहे. अलिबाग तहसीलदार यांना संबंधित तक्रारीनुसार सर्वे करून सचित्र आणि वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल.
संदेश शिर्के,
निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड