बाप्पांच्या विसर्जनासाठी भक्तांना आर्थिक भुर्दंड

बाप्पांच्या विसर्जनासाठी भक्तांना आर्थिक भुर्दंड

रेवदंड्यात होडींतून बाप्पाचे विसर्जन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३०५९९३

अलिबाग:- बुधवारी(27)बाप्पाचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. 28) दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. संध्याकाळी चार वाजल्यापासून विसर्जन सोहळ्यास प्रारंभ झाला. परंतु, रेवदंडा समुद्रकिनारी आलेल्या चिखलामुळे भक्तांचे हाल झाले. दरम्यान, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किनाऱ्यावर बाप्पांचे विसर्जन करण्यात अडचण निर्माण झाली. त्याचा नाहक त्रास स्थानिकांना सोसावा लागल्याचा आरोप आहे. किनाऱ्यापर्यंत बाप्पांना घेऊन जाणे शक्य नसल्याचा फायदा घेत काही स्थानिक बोटीवाल्यांनी विजर्सनासाठी पैसे घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.

दरवर्षी रेवदंडा समुद्रकिनारी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडते. मात्र, यंदा ओहोटीमुळे समुद्राचे पाणी मागे सरकल्याने संपूर्ण किनाऱ्यावर चिखल साचला आहे. हा चिखल दलदलीसारखा झाल्याने पाय आत खोलवर जात होते आणि अडकण्याचा धोका निर्माण झाला. परिणामी, भक्तांना नेहमीप्रमाणे थेट समुद्रात उतरून विसर्जन करणे शक्य झाले नाही. परंतु, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने हाल झाल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच मोरे यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही.

समुद्रकिनाऱ्यावर साचलेला चिखल जेसीबीच्या सहाय्याने काढून विसर्जनासाठी रस्ता तयार करण्यात आला. परंतु, चिखल जास्त प्रमाणात असल्याने किनाऱ्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. दरम्यान, याठिकाणी काही स्थानिक कोळी बांधवांनी विसर्जनासाठी होड्या सज्ज ठेवल्या होत्या. परंतु, होडीतून बाप्पांना नेण्यासाठी पैसे आकारले जात होते. एका होडीत एकावेळी पाच ते सहा गणपती नेऊन समुद्रात विसर्जित करण्यात आले. एका गणेशमूर्तीसाठी 200 रुपये आकारल्याची चर्चा आहे. परंतु, ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष देऊन उपाययोजना केली असती, तर नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला नसता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, रेवदंडा मुख्य समुद्रकिनाऱ्याला चिखलाचे स्वरूप आले असल्याने रेवदंडा पुलाजवळील खाडीत पाणी जास्त असल्याने तेथे बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.