ऐन सणामध्ये नारळ महाग; मोदकांना महागाईची झळ

ऐन सणामध्ये नारळ महाग; मोदकांना महागाईची झळ

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- ऐन सणांच्या दिवसात बाजारात नारळाचा तुटवडा असल्याने भाव वधारले होते. त्यात आता गणेशोत्सवाच्या तोंडावर मागणीत आणखी वाढ झाल्याने घाऊक बाजारात नारळ दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होऊन घाऊक बाजारात 28 ते 65 रुपये प्रति नग नारळ विकला जात आहे. दुसरीकडे किरकोळ बाजारात 40 ते 75 रुपये प्रति नग नारळ विकला जात आहे. त्यामुळे यंदा बाप्पासाठी लागणाऱ्या मोदकांना महागाईची झळ बसली आहे.

सणासुदीत प्रसाद, देवपूजा, मिठाई, मोदक या पदार्थांसाठी नारळ खोबऱ्याची मोठी मागणी असते. परंतु, यंदा नारळाची आवक घटली आहे. दक्षिणेतील राज्यात पावसाळ्यात उष्णता वाढल्यानं नारळ खराब होत त्यांना कीड लागली. त्यामुळे यंदा नारळाची आवक कमी झाली आहे. परिणामी, गणेशोत्सवामुळं नारळाची मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने नारळाचे भाव दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. याशिवाय सुक्या खोबऱ्याची किंमत 400 रुपये किलोपर्यंत गेली आहे. यंदा दक्षिणोत्तर राज्यांमध्ये जिथे एका झाडावर 100 नारळ येत होते, तिथे केवळ 55 ते 60 नारळ मिळत असल्याने नारळाची आवक घटली आहे. त्यामुळे नारळ, खोबरे आणि खोबरेल तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पनवेल बाजारात 30 ते 45 रुपयांमध्ये मिळणारा नारळ आता 28 ते 65 रुपये तर किरकोळ बाजारात 40 ते 75 रुपये दराने विकला जात आहे. घरामध्ये वापरले जाणारे सुके खोबरे चारशे रुपये किलोपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे यंदा बाप्पासाठी लागणारे मोदक बनविताना गृहिणींना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

नारळाचा तयार किस देखील महाग
नारळ महाग झाल्याने खोबऱ्याचा कीस 600 ते 650 रुपये प्रतिकिलो दराने मिळण्याचा अंदाज नारळ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. यासोबतच मिठाई बनविताना देखील नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, नारळ महागल्याने नारळाचे मोदक, लाडू आणि मिठाईदेखील महाग झाली आहे