तलासरी पोलीस ठाण्याचा अनोखा उपक्रम
गणेशोत्सवात सायबर गुन्हे व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
अरविंद बेंडगा जिल्हा प्रतिनिधी, पालघर
तलासरी :- गणेशोत्सवाचे औचित्य साधून तलासरी पोलीस ठाण्याने समाजहिताचा संदेश देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस ठाण्यात गणपती बाप्पांची स्थापना करून नागरिकांना सायबर गुन्हे व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात येत आहे.
डिजिटल युगात वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेऊन सोशल मीडियावरील बनावट खाती, फेक लोन ॲप्स, लग्नाच्या आमिषाचे फसवेगिरी प्रकार, सेक्सटॉर्शन, डिजिटल अटक, एटीएम फसवणूक अशा विविध प्रकारांविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली. मोबाईल हरवल्यास CEIR पोर्टलवर नोंद करण्याचे, अनोळखी लिंक किंवा ॲप डाउनलोड न करण्याचे, तसेच वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
“नशामुक्त भारत” या अभियानाचाही संकल्प या उपक्रमातून राबवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आणि सावध राहण्याचे आवाहन केले. तर पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले की, “जनजागृतीसाठी विशेष बॅनर लावले असून आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमाला भेट दिली आहे.”
गणेशोत्सवासारख्या धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा अनोखा उपक्रम सकारात्मक ठरत असून, समाजहितासाठी आदर्शवत उदाहरण ठरत आहे.