थेरोंडा गावातील मूलभूत सुविधांचा अभाव : ग्रामस्थांचा संताप
आदिवासी युवा शक्ती फाऊंडेशनकडून खासदार व लोकप्रतिनिधींना निवेदन
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
विक्रमगड :- स्वातंत्र्याला तब्बल ७९ वर्षे उलटून गेली असली तरी विक्रमगड तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील थेरोंडा गाव आणि परिसरातील पाड्यांना अद्यापही रस्ता, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी युवा शक्ती फाऊंडेशन महाराष्ट्र तर्फे अध्यक्ष महेश घाटाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांसह खासदार व लोकप्रतिनिधींना निवेदन सादर करण्यात आले.
थेरोंडा गावाला जोडणारा मुख्य रस्ता मोरेपाडा, पाटिलपाडा आणि मुरबिपाडा या तीन पाड्यांमधून जातो. मात्र पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय व खड्डेमय झाल्याने वाहतूक ठप्प होते. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, रुग्णांना दवाखान्यात नेणे तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. याशिवाय पाणीपुरवठा आणि वीज या मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
“गावात लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
या निवेदनाची प्रत खासदार हेमंत विष्णू सवरा, आमदार तसेच संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांना देण्यात आली असून शासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी ठाम अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.