गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. जयघोषात

27

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. जयघोषात
म्हसळ्यात पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी.. चुकले आमचे काही क्षमा असावी..

म्हसळा तालुका प्रतिनिधी: संतोष उध्दरकर.

म्हसळा: गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला… या जयघोषात म्हसळा तालुक्यासह शहरात पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.भाद्रपद शु.४ दि. २७ ऑगष्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे वाजत गाजत घरोघरी आगमन झाले होते, अनेकांच्या घरामध्ये भजन, किर्तन, आरती या सर्वाचा नाद घुमत होता अगदी सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते, बघता बघता सहा दिवस होऊन सातव्या दिवशी बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला, या वर्षी पाच दिवस ऐवजी सात दिवस बाप्पा असल्याने गणेश भक्तां मध्ये अधिक उत्साह दिसत होता. बाप्पाला निरोप देतांना अनेकांचा कंठ दाटुन येत होता.. काही लहान मुलांना अश्रु अनावर होताना दिसत होते… शहरात बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळेजण सज्ज झाले.बाप्पाची वाजत गाजत व फुलांची उधळण करीत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी विसर्जन घाटावर म्हसळा नगरपंचायत कडुन अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, विसर्जन घाट ठिकाणी कृत्रीम तलाव, निर्माल्य कलश, लाईट व्यवस्था, लाईफ गार्ड, तसेच गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी कर्मचारी देखील नेमण्यात आले होते, सुरक्षिततेच्या दृष्टीने लहान मुलांना पाण्यात उतरविण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज होते तसेच वाहतुक सुरळीत सुरु रहावी व विसर्जन मिरवणुक व्यवस्थीत पार पड़ावी यासाठी देखील पोलीस प्रशासना कडुन खबरदारी घेण्यात येत होती. यावेळी श्री सिद्धी हॉटेल च्या वतीने गणेश विसर्जन मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक गणेश भक्तांना चहा, अल्पोपहार देण्यात येत होते, हा उपक्रम कै चंद्रकांत कापरे यांच्या स्मरणार्थ व कापरे यांची मित्र प्रेम, निष्ठा मोठ्या प्रमाणात असल्याने याचे आयोजन करण्यात आले होते. असे संदीप गव्हाणे यांनी सांगितले.