आदिवासी युवा शक्ती संघटनेच्या पाठपुराव्याला यश – थेरोंडा मोरेपाडा येथे धोकादायक डीपी स्थलांतरित
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
विक्रमगड :- थेरोंडा मोरेपाडा येथील वीज वितरणासाठी लावलेली डीपी अतिशय जीर्ण अवस्थेत असल्यामुळे परिसरातील नागरिकांवर जीवितहानीचा धोका निर्माण झाला होता. याबाबत आदिवासी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष महेश घाटाळ, रामदास चौरे आणि अविनाश डगला यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे गंभीर इशारा दिला होता.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते की, डीपीमधील केबलमध्ये सतत शॉर्टसर्किट, स्पार्किंग आणि संभाव्य स्फोटाचा धोका निर्माण होत होता. ही डीपी नागरिकांच्या दैनंदिन हालचालीच्या ठिकाणी असल्यामुळे, केबल एकमेकांना लागणे किंवा तुटणे यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, असा गंभीर इशारा संघटनेने दिला होता.
त्यामुळे तात्काळ उपाययोजना म्हणून डीपी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी आणि ट्रान्सफॉर्मरची योग्य पद्धतीने जोडणी करावी, अशी ठाम मागणी संघटनेने केली होती. तसेच, कोणत्याही दुर्घटनेला महावितरण जबाबदार राहील, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
संघटनेच्या या पाठपुराव्याची दखल घेत महावितरणाने तत्काळ काम हाती घेतले असून सध्या डीपी स्थलांतराचे काम सुरू आहे. या तात्काळ कारवाईबद्दल आदिवासी युवा शक्ती संघटनेकडून महावितरणचे आभार मानण्यात आले आहेत.